अहमदाबाद : गेल्या २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील अंतराळ तळावरून प्रक्षेपित करण्यात आलेले भारताचे ‘चांद्रयान-२’ येत्या २० आॅगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल व ते ७ सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरेल, असे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी सोमवारी येथे सांगितले.भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. सिवान येथे आले होते. ‘चांद्रयान-२’चे ‘आॅर्बिटर’, ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’ हे तिन्ही भाग सुस्थितीत असून सर्व यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.‘इस्रो’चे अध्यक्ष म्हणाले की,प्रक्षेपण केल्यापासून गेल्या तीन आठवड्यात ‘चांद्रयान-२’ची कक्षा आणि मार्ग बदलण्यासाठी एकूण पाच क्रिया केल्या गेल्या. १४ आॅगस्टला पहाटे ३.३० वाजता यापुढील ‘ट्रान्स ल्युनर इंजेक्शन’ हा महत्वाचा टप्पा पार पाडला जाईल. त्यामुळे हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने मार्गस्थो होईल. (वृत्तसंस्था)
‘चांद्रयान-२’ पुढच्या मंगळवारी चंद्राच्या कक्षेत, इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 3:57 AM