नवी दिल्ली - महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्टभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग न झाल्याने इस्रोला धक्का बसला होता. मात्र चांद्रयान-2 मोहिमेच्या अगदी निर्णायक टप्प्यावर आलेले अपयश झटकून इस्रो पुढच्या तयारीला लागली आहे. येत्या काळात चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे. तसेच पुढच्या काही दिवसांमध्ये अॅडव्हान्स सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्याची योजना इस्रोसकडून आखण्यात आली आहे. चांद्रयान-2च्या लँडरला चंद्राच्या पृष्टभागावर लँडिंग करण्यात आलेल्या अपयशाबाबत इस्रोचे प्रमुख म्हणाले की, ''चांद्रयान-2 च्या कहाणीची अद्याप अखेर झालेली नाही. भविष्यात चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. चांद्रयान-2 मोहिमेबाबत तुम्हाला माहिती असेलच. तांत्रिक बाबींचा विचार केला तर आम्ही विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिग करू शकलो नाही ही बाब खरी आहे. पण चंद्राच्या पृष्टभागापासून 300 मीटर अंतरापर्यंत संपूर्ण प्रणाली व्यवस्थित काम करत होती.'' ''अखेरच्या टप्प्यात मोहिमेला अपयश आले असले तरी आमच्याकडे खूप मह्त्त्वपूर्ण माहिती गोळा झालेली आहे. आता भविष्यात इस्रो आपला अनुभव आणि तांत्रिक खबरदारीच्या जोरावर सॉफ्ट लँडिंगसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.'' असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला. इस्रोच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आयआयटीमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी इस्रोचे प्रमुख उपस्थित होते. चांद्रयान-2 मोहीम ही काही कथानकाची अखेर नाही आहे. आमचे आदित्य एल-1 सोलर मिशन, ह्युमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅम सध्या प्रगतीपथावर आहेत. येत्या काही महिन्यांत अॅडव्हान्स सॅटेलाइटही लाँच करण्यात येणार आहेत. एसएसएलव्ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये उड्डाण करणार आहे. 200 टन सेमी क्रायो इंजिनाची टेस्टिंग लवकरच सुरू होणार आहे. तसेच मोबाइल फोनवर NAVIC सिग्नल पाठवण्याबाबतही लवकरच काम सुरू होणार आहे.
पिक्चर अभी बाकी है! भविष्यात चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून दाखवू - के. सिवन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 4:26 PM