नवी दिल्ली: चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगमुळे इतिहासात प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून अवकाश विज्ञानातील यशाची नवी व्याख्या लिहिल्यानंतर लँडर आणि रोव्हरमध्ये गुंतलेले पेलोड चंद्राचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
चंद्रावर उतरल्यानंतर नवख्या वातावरणात विक्रम लँडरने सर्वप्रथम चंद्रावरील तापमानाची माहिती दिली आहे. पृष्ठभागाच्या आत आणि वर नेमके किती तापमान आहे, याची अचूक माहिती हाती आलेली आहे. खाेलीनुसार तापमानात कसा बदल होतो, याचा अंदाज त्यातून मिळाला आहे. विक्रम लँडरवर चंद्र सरफेस थर्माेफिजिकल एक्स्पेरिमेंट अर्थात ‘चास्टे’ या पेलोडद्वारे तापमानाची माहिती घेतली. ‘चास्टे’वर विविध प्रकारचे १० तापमानमापक सेन्सर लावण्यात आले आन्त. ते पृष्ठभागाखाली १० सेंटिमीटरपर्यंत जाऊन तापमान माेजू शकतात.
कमाल तापमान ७० अंश सेल्सिअस-
चंद्राच्या तापमानाबाबत प्राप्त झालेल्या ताज्या माहितीचे स्पष्टीकरण देताना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे शास्त्रज्ञ बीएचएम दारुकेशा यांनी सांगितले की, चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान सुमारे २० डिग्री सेल्सिअस ते ३० डिग्री सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे. अंदाज होता, परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर कमाल तापमान ७० अंश सेल्सियस होते, जे अपेक्षेपेक्षा दुप्पट आहे.
इस्रोने तापमानाचा आलेख केला जाहीर
शास्त्रज्ञ बीएचएम दारुकेशा यांनी सांगितले की, एवढे तापमान असणे आश्चर्यकारक आहे. पृथ्वीवर दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवर, आपल्याला तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसचा फरक क्वचितच दिसतो, तर चंद्रावर तो सुमारे ५० अंश सेल्सिअस असतो. रविवारी इस्रोने पोस्ट केलेला तापमान आलेख जारी करताना, विक्रम लँडरवरील चास्टे पेलोडने चंद्राच्या पृष्ठभागाचे थर्मलवर्तन समजून घेण्यासाठी दक्षिण ध्रुवाभोवती चंद्राच्या वरच्या मातीचे तापमान मोजले.