Chandrayaan 3 श्रीहरी कोटा - देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावर सज्ज झाले होते. सकाळपासूनच या ऐतिहासिक उड्डाणाची तयारी सुरू होती. तर, देशभरातून इस्रोच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन होत आहे. आज दुपारी २.३५ वाजता चंद्रयान ३ ने अवकाशात यशस्वी झेप घेतली आणि एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांनी ट्विट करुन भारताच्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. तसेच हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल, असेही मोदींनी म्हटले आहे.
चंद्रयान मोहिमेसाठी आत्तापर्यंत या रॉकेटने १०० टक्के यशस्वी प्रक्षेपण केले आहे. त्यामुळेच, प्रक्षेपण तर यशस्वी होणारच; पण पुढे चंद्रावर ऐतिहासिक लॅण्डिंगच्या यशाबद्दलही शास्त्रज्ञ आशावादी आहेत. आज ठरल्याप्रमाणे २.३५ मिनिटांनी या चंद्रयानाने अवकाशात झेप घेतली. आता, पुढील ४२ दिवस या यानाकडे इस्रोतील शास्त्रज्ञांचे लक्ष असणार आहे. या मोहिमेच्या यशस्वी उड्डाणाचे आनंद इस्रोतील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येत आहे.