बुधवारी २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चंद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर अलगदपणे उतरला. त्याबरोबर भारत आणि इस्रोने अंतराळ संशोधनात एक नवा इतिहास रचला आहे. या यशानंतर देशात आनंदाचं वातावरण आहे. मात्र राजकीय वर्तुळात या यशानंतर श्रेयवादाचं नाट्य रंगलं आहे. दरम्यान, चंद्रयान-३ च्या यशानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी यांनी चंद्रयान ३ च्या यशानंतर भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याऐवजी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचं नाव घेतलं. त्यानंतर हा व्हिडीओ आता चर्चेचा विषय ठरला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनी चंद्रावर अंतराळवीर पाठवला होता. तेव्हा मी लहान होते. चंद्राच्या जमिनीवर जेव्हा ते पोहोचले तेव्हा इंदिरा गांधी यांनी राकेश रोशन यांना विचारले होते की, तिथून भारत कसा दिसतोय, तेव्हा ते म्हणाले होते की, सारे जहाँ से अच्छा.
या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याबाबत बोलत होत्या. मात्र त्यांनी राकेश शर्मा यांच्याऐवजी चुकून राकेश रोशन असा उल्लेख केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच लोक ममता बॅनर्जी यांना ट्रोल करत आहेत.