आपल्या चंद्र मोहिमेतील 'चांद्रयान-3' च्या रोव्हर 'प्रज्ञान'ने जे काम करणे अपेक्षित होते ते केले आहे. यामुळे, जर ते सध्याच्या स्लीप मोडमधून सक्रिय होण्यास अयशस्वी ठरले, तरीही काही हरकत नाही, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. येथेच त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.
याच बरोबर, राष्ट्रीय अंतराळ संस्था आता एक्सपीओसॅट अथवा एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह प्रक्षेपणाची तयारी करत आहे आणि हे प्रक्षेपण नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात केले जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
'प्रज्ञान' रोव्हरच्या स्लीप मोडसंदर्भात बोलताना इस्रो प्रमुख म्हणाले, "चंद्रावरील तापमान 0 पेक्षाही 200 अंश सेल्सिअसने खाली गेल्या नंतर, निर्माण झालेल्या अती प्रतिकूल हवामानामुळे त्याचे इलेक्ट्रॉनिक सर्किट खराब झाले नसल्यास, ते पुन्हा सक्रिय होईल. पण हे सक्रिय झाले नाही, तरी काही हरकत नाही. कारण जे काम रोव्हरकडून अपेक्षित होते, ते त्याने केले आहे.''
गेल्या आठवड्यात इस्रोने म्हटले होते की, चंद्रावर सकाळ होताच 'चंद्रयान-3'च्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' सोबत संपर्क स्थापित करून ते पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चंद्रावर रात्र होण्यापूर्वी, लँडर आणि रोव्हर दोन्ही अनुक्रमे चार आणि दोन सप्टेंबरला निष्क्रिय अवस्थेत गेले होते.