चांद्रयान-3 मोहिमेत भारताला मोठे यश मिळाले आहे. भारताच्या या यशाने संपूर्ण जग दिपून गेले आहे. या यशानंतर, आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO एका अशा मिशनची योजना आखत आहे, ज्यात चंद्रावरील नमूने पृथ्वीवर आणणे शक्य होईल. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठ भागावर विक्रम लँडरचे वर उठणे आणि पुन्हा एकदा यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करणे, त्याच दिशेने टाकले गेलेले एक महत्वाचे पाऊल होते.
इस्रोच्या एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 चे निष्कर्ष, प्रामुख्याने यशस्वी हॉप प्रयोग, भविष्यातील चंद्र मिशनचा आधार असेल. स्पेस एजन्सी या प्रयोगांच्या आधारे चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्याच्या उद्देशाने एक कार्यक्रम तयार करेल.
हिंदुस्तान टाइम्सने संबंधित अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “यासाठी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची निश्चित काल मर्यादा नाही. मात्र आम्ही आपली सिस्टिम अशा पद्धतीने विकसित करण्यावर काम करत आहोत. जिच्या सहाय्याने परतीचे उड्डाणही शक्य होईल. हॉप एक्सपेरिमेंट केवळ एका मोठ्या योजनेचे प्रदर्शन होते.” अगदी थोड्या देशांनी हॉप बनविण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. 3 सप्टेंबरला लँडरने जम्प केल्यानंतर, चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठ भागावर पुन्हा एकदा यशस्वीपणे पुन्हा सॉफ्ट लँडिंग केले होते.
इस्रोने म्हटले होते की, स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी एका प्रक्रिये अंतर्गत कमांड मिळाल्यानंतर, ‘विक्रम’ लँडरने इंजिन ‘फायर’ केले, अंदाजानुसार, जवळपास 40 सेंटीमीटरपर्यंत स्वतःला वर उचलले आणि 30-40 सेंटीमीटर पुढे पुन्हा सुरक्षितपणे लँड केले. एवढेच नाही तर, 'विक्रम' लँडर आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी पुढे सरकले आहे. या मोहिमेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या प्रक्रियेमुळे भविष्यात चंद्रावरील 'नमुने' पृथ्वीवर आणण्याच्या आणि चंद्रावरील मानव मिशनसंदर्भात आशा वाढल्या आहेत, असेही इस्रोने म्हटले आहे.