नवी दिल्ली: अंतराळ संशोधनाच्या इतिहासामध्ये भारतासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्राच्या दिशेनं झेपावलेलं भारताचं चंद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत फिरत असून आज या यानामधील विक्रम लँडर हा चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.
नियोजित वेळेनुसार आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी लँडर विक्रम चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास तो लगेच आपलं काम सुरू करेल. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर त्यामधून प्रज्ञान हा सहा पायांचा रोव्हर बाहेर येईल. त्याल इस्त्रोकडून कमांड मिळताच तो चंद्राच्या पृष्टभागावर चालेल. तो ५०० मीटरपर्यंत जाऊन पाणी आणि तेथील वातावरणाबाबतची माहिती इस्रोला देईल. यादरम्यान प्रज्ञान त्याच्या चाकांवर लावलेले अशोक स्तंभ आणि इस्रोच्या चिन्हाची छापही चंद्रावर सोडेल.
इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेसंदर्भात आपल्या कमांड सेंटरची दोन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी प्रत्येक पॅरामीटरवर लक्ष दिले जात आहे. इस्रोने माहिती दिली की लँडर मॉड्यूल लँडिंगची प्रक्रिया सायंकाळी १७.४४ वाजता सुरू होईल. केंद्राकडून कमांड मिळाल्यानंतर लँडर मॉड्यूल त्याचे इंजिन सुरू करेल आणि मिशन ऑपरेशन्स टीम त्याला सतत कमांड पाठवेल. या संपूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ५.२० पासून सुरू होईल.
इस्रोचा प्लॅन बी तयार; ...तर लँडिंग २७ ऑगस्टला
चंद्रयान-३मधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू असल्याबद्दल इस्रोकडून वारंवार तपासणी केली जात आहे. या यंत्रणा तसेच चंद्रावरील वातावरण या सर्व गोष्टींमध्ये अपेक्षेपेक्षा काही वेगळे बदल जाणवले तर इस्रोने चंद्रयान-३चे लँडिंग २३ ऑगस्टऐवजी २७ ऑगस्टला करण्याचा पर्यायही ठेवला आहे. यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतरही हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे इस्रोने म्हटले आहे.
लँडिंगनंतर काय होणार?
चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरल्यानंतर तो अधिक सक्रिय होईल. त्याचे रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरेल. त्यानंतर विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर परस्परांची छायाचित्रे टिपणार असून ती पृथ्वीवर पाठवतील.
ज्यांनी दाखवले स्वप्न, त्यांच्या नावाचे ‘विक्रम’ चंद्रावर उतरणार
पं. जवाहरलाल नेहरू आणि संशोधक डॉ. विक्रम साराभाई यांच्या संकल्पनेतून भारत सरकारने अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची १९६२ मध्ये स्थापना केली. त्यातूनच पुढे १५ ऑगस्ट १९६९ रोजी इस्रोची स्थापना झाली. तेव्हाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण होईल.