चंद्रयान-3 मोहिमेच्या यशाला आठ महिने पूर्ण झाले आहेत. चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करून इतिहास रचला. आता चंद्रयान-2 संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोच्या चंद्रयान-2 मोहिमेने चंद्राला समजून घेण्याच्या दृष्टीने आणखी एक अभूतपूर्व शोध लावला आहे.
'टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, चांद्रयान-2 मोहिमेच्या अलीकडील निष्कर्षांवरून चंद्राच्या ध्रुवीय विवरांमध्ये पाण्याचा मोठा साठा असल्याचे समोर आले आहे. या शोध म्हणजे, मोठे यश मानले जात आहे. यामुळे जगभरातील वैज्ञानिकांना चंद्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. ISRO चे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (SAC) आणि IIT कानपूर, युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी आणि IIT (ISM) धनबाद यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांच्या प्रयत्नातून हा महत्त्वाचा शोध लागला आहे.
इंटरनॅशनल सोसायटी फॉर फोटोग्रामेट्री अँड मॅथ सेन्सिंग जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात दिसून आले आहे की, चंद्राच्या ध्रुवीय विवरांमध्ये भूपृष्ठावरील बर्फ हा पृष्ठभागावरील बर्फापेक्षा 5 ते 8 पट अधिक असण्याची शक्यता आहे. या शोधाचे परिणाम दूरगामी आहेत. भविष्यातील चंद्र मोहिमा या जलसाठ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतील.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, चंद्राच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशात दक्षिण ध्रुवीय प्रदेशाच्या तुलनेत दुप्पट पाण्याचे बर्फ आहेत, हेही या अभ्यासातून समोर आले आहे. हे भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी साइट निवडीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.