Chandrayaan-3 Mission, ISRO: १४ जुलै हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. याच दिवशी भारताचे चंद्रयान तिसऱ्यांदा चंद्राच्या दिशेने झेपावले. पहिल्या दोन प्रयत्नात आलेल्या अपयशानंतर, आता भारताचा तिसरा प्रयत्न नक्की यशस्वी ठरावा, यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम घेतले आहेत. तसेच, संपूर्ण भारत देश यासाठी प्रार्थना करत आहे. १४ जुलैला प्रक्षेपित झालेले चंद्रयान अंदाजे ४० ते ४२ दिवसांनी चंद्रावर उतरणार आहे असे सांगितले जात आहे. यासंबंधी आता एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट मिळाली आहे.
चंद्रयान-3 ची सध्या काय परिस्थिती?
चंद्रयान पृथ्वीच्या चौथ्या कक्षेबाहेर नेण्याचे काम पूर्ण झाले आहे. इस्रोने सांगितले की, सध्या पृथ्वीपासून चंद्रयान-3 चे अंतर 71 हजार किमीपेक्षा जास्त आहे. थर्स्ट दिल्यानंतर पृथ्वीपासूनचे अंतर 1,27,690 किमी होईल. आता 1 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 ते 1 या वेळेत थर्स्ट दिली जाणार आहे. 14 जुलै रोजी प्रक्षेपित केलेले चंद्रयान-3 हळूहळू पृथ्वीभोवती आपली कक्षा वाढवत आहे. अंतरिक्ष यान हे लॉन्च व्हेइकल मार्क-3 (एलवीएम-3) द्वारे एका त्रुटिहीन लिफ्ट-ऑफ मध्ये 36,500 किमी x 170 किमीच्या अंडाकार पार्किंग कक्षेत सेट केले गेले होते. 15 जुलैला चंद्रयान-3 ने पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत प्रवेश केला. 17 जुलैला दुसऱ्या कक्षेत आणि १८ जुलैला तिसऱ्या कक्षेत प्रवेश घेतला. २० जुलैला रोजी ते चौथ्या कक्षेत दाखल झालं. आता चौथ्या कक्षेतून ते थर्स्ट दिल्यावर पुढे अधिक वेगवान आगेकूच करणार आहे.
चंद्रयान चंद्राच्या अधिक जवळ...
चंद्राचे गुरुत्वाकर्षण कालांतराने चंद्रयान-3 ला चंद्राच्या कक्षेत खेचून घेईल आणि या ऐतिहासिक मोहिमेचा पुढील टप्प्या सुरू होईल. चंद्रयान-3 ची मोहीम केवळ चंद्रापर्यंत पोहोचण्यापलीकडे आहे. चंद्राचा इतिहास, भूविज्ञान आणि संसाधन क्षमता यासह चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक प्रयोग करणे हा त्याचा उद्देश आहे. अंतराळ यानामध्ये इस्रोने विकसित केलेला लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे, जे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरण्यासाठी, डेटा गोळा करण्यासाठी आणि वैज्ञानिक प्रयोगांची मालिका आयोजित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
सॉफ्ट लँडिंग 23 किंवा 24 ऑगस्टला होणार
विक्रम नावाचे लँडर आणि प्रज्ञान नावाचे रोव्हर 23 ऑगस्ट रोजी दक्षिण ध्रुवीय क्षेत्राजवळ उतरण्याची अपेक्षा आहे. ही मोहिम चंद्रयान-2 चे अनुकरण करत आहे. पण चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर शेवटच्या क्षणी लँडर विक्रम क्रॅश झाला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, चंद्रयान-3 चंद्राच्या 5-6 प्रदक्षिणा पूर्ण करेल आणि सर्वात आतल्या वर्तुळात प्रवेश करेल, त्यानंतर चंद्रावरील अचूक स्थान शोधण्यासाठी आणखी दहा दिवस लागतील. चंद्रयान-3 ही मोहीम इस्रोच्या भविष्यातील आंतरग्रहीय मोहिमांच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जग श्वास रोखून पाहत असताना, चंद्राची रहस्ये उघड करण्याच्या दिशेने भारताचा प्रवास एक रोमांचक झेप घेत आहे.