ISRO Chandrayaan 3: चंद्रयान-३ चे विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागावर दाखल झाले आणि देशभरात एकच जल्लोष करण्यात आला. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याच्या काही क्षण आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोहान्सबर्ग येथून लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये सहभागी झाले. चंद्रावर भारतमुद्रा उमटल्याच्या भव्य यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी इस्रोचे तोंडभरून कौतुक केले आहे तसेच या अवकाश संशोधन संस्थेच्या भावी प्रकल्पांना शुभेच्छा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशात परतताच बंगळूरू येथे जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला आहे. दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान-३ चे लँडिंग लाईव्ह पाहणारे पंतप्रधान मोदी यांनी मिशन यशस्वी होताच इस्रो प्रमुखांशी फोनवर संवाद साधला. यानंतर आता मीडिया वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी २६ ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथे जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी इस्रो प्रमुखांना दिला शब्द
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान ३ मिशनच्या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी फोनवरून संवाद साधताना इस्रो प्रमुखांना भेट देण्यासंदर्भात शब्द दिला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, भारताची यशस्वी चंद्रमोहीम ही केवळ आमच्याच देशापुरती नव्हती. वसुधैव कुटुंबकम ही भारताची भूमिका आहे. मानवजातीला केंद्रीभूत मानून चंद्रयान-३ मोहीम आखण्यात आली होती. त्यामुळे चंद्रावर भारताने ठेवलेले पाऊल हे यश साऱ्या मानवजातीचे आहे.
दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-३ सुखरूप उतरताच सोशल मीडियाच्या जगतातही भारताने इतिहास रचला. चंद्रयान ३ च्या ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ने जागतिक विक्रम मोडला. इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर लँडिंग होताना सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटाला तब्बल ८०,५९,६८८ जणांनी लाइव्ह सोहळा पाहिला.