बंगळुरू : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झालेले विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर यांचे कार्य नीट सुरू आहे. विक्रम लँडरमधील आयएलएसए, रंभा, सीएचएएसटीई या पेलोडनी गुरुवारी आपले काम सुरू केले. विक्रम लँडरच्या सोबत आलेल्या प्रग्यान रोव्हरने काही अंतर मूनवॉकही केला अशी माहिती इस्रोने दिली आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर इस्रोने निश्चित केलेल्या जागीच विक्रम लँडर उतरला. इतके अचूक काम या मोहिमेत झाले आहे. दक्षिण ध्रुवावरील ४.५ किमी x २.५ किमीच्या विशिष्ट पट्ट्यातील एका जागी विक्रम लँडरला उतरविण्याचे ठरविले. त्याच पट्ट्यात ३०० मीटरच्या परिघात हे सॉफ्ट लँडिंग झाले. विक्रम लँडरचे लँडिंग झाल्यानंतर काही तासांनी प्रग्यान रोव्हरही चंद्राच्या पृष्ठभागावर आला. त्याचेही कार्य व्यवस्थित सुरू आहे. विक्रम लँडरवर तीन व प्रग्यान रोव्हरवर दोन उपकरणे आहेत.
‘लँडर, रोव्हरचे आयुर्मान १४ दिवसांपेक्षाही अधिक’
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविलेल्या विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हरचे आयुर्मान चंद्रावरील एक दिवस किंवा पृथ्वीवरील १४ दिवसांपुरतेच मर्यादित नसून चंद्रावर पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर ही उपकरणे कार्यरत राहतील असा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी यांची शनिवारी इस्रोला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथे येत्या शनिवारी, २६ ऑगस्टला इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन चंद्रयान-३च्या यशाबद्दल अभिनंदन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे बंगळुरूच्या एचएएल विमानतळावर भव्य स्वागत करण्याचे कर्नाटक भाजपने ठरविले आहे. ही माहिती भाजप नेते आर. अशोक यांनी दिली. विमानतळावर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांसमोर मोदींचे भाषणही होण्याची शक्यता आहे, असेही आर. अशोक म्हणाले.
ओडिशात चार बालकांचे नाव ‘चंद्रयान’
ओडिशातील केंद्रपाडा जिल्हा रुग्णालयात जी बालके जन्माला आली, त्यापैकी तीन मुले व एका मुलीचे चंद्रयान असे नाव ठेवण्यात येणार आहे.