नवी दिल्ली: चांद्रयान-३चे लँडर विक्रम २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याच्या नियोजित वेळेवर उतरले. रोव्हर प्रज्ञान लँडिंगच्या काही तासांनंतर लँडरमधून बाहेर आले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले.
इस्रो रोव्हर प्रग्यानशी संबंधित अपडेट्स सतत जगासोबत शेअर करत आहे. दरम्यान, इस्रोने नुकतीच माहिती दिली की, रोव्हर प्रग्यानने चंद्रावरील ८ मीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. रोव्हरला जोडलेले पेलोड LIBS आणि APXS कार्यरत आहेत. इस्रोने पुढे माहिती दिली की प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि रोव्हरवरील सर्व पेलोड निर्दोषपणे काम करत आहेत.
या माहितीपूर्वी इस्रोने आपल्या 'X' हँडलवरून एक उत्तम व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. इस्रोने शुक्रवारी लँडर 'विक्रम' वरून चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर 'प्रज्ञान' उचलल्याचा व्हिडिओ शेअर केला, जो लँडरच्या इमेजर कॅमेऱ्याने टिपला आहे. इस्रोने पुढे सांगितले की, रोव्हरचे सोलर पॅनलही उघडण्यात आले आहे, जेणेकरून रोव्हरमध्ये वीज निर्माण करता येईल.
‘लँडर, रोव्हरचे आयुर्मान १४ दिवसांपेक्षाही अधिक’
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविलेल्या विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हरचे आयुर्मान चंद्रावरील एक दिवस किंवा पृथ्वीवरील १४ दिवसांपुरतेच मर्यादित नसून चंद्रावर पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर ही उपकरणे कार्यरत राहतील असा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी यांची शनिवारी इस्रोला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथे येत्या शनिवारी, २६ ऑगस्टला इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन चंद्रयान-३च्या यशाबद्दल अभिनंदन करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे बंगळुरूच्या एचएएल विमानतळावर भव्य स्वागत करण्याचे कर्नाटक भाजपने ठरविले आहे. ही माहिती भाजप नेते आर. अशोक यांनी दिली. विमानतळावर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांसमोर मोदींचे भाषणही होण्याची शक्यता आहे, असेही आर. अशोक म्हणाले.