मुंबई – भारताचं तिसरं मून मिशन चंद्रयान ३ यशस्वी झाले आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान ३ नं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. या लँडिंगच्या २ तास २६ मिनिटांनी अखेर रोवर बाहेर आला आहे. भारताच्या चंद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून नवा इतिहास रचला आहे. ४० दिवसांच्या दिर्घ प्रवासानंतर बुधवारी चंद्रयान ३ च्या लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले. आता त्यातून रोवरही बाहेर पडला आहे.
चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर २ तास २६ मिनिटांनी रोवर बाहेर आला आहे. हा रोवर सहा चाकांचा रोबोट आहे. तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहे. या रोवरच्या चाकांवर अशोक स्तंभाची प्रतिमा छापली आहे. जस जसं रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर जाईल तिथे अशोक स्तंभाचा ठसा उमटत जाईल. रोवरचं मिशन लाईफ १ लूनर डे आहे. चंद्रावरील १ दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. तर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश भारत आहे. याआधी सप्टेंबर २०१९ ला चंद्रयान २ दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा प्रयत्न झाला परंतु हार्ड लँडिंगमुळे ते क्रॅश झाले. इस्त्रोने २००८ मध्ये पहिले मून मिशन चंद्रयान १ लॉन्च केले होते. त्यात केवळ ऑर्बिटर पाठवला होता. ज्याने ३१२ दिवसापर्यंत चंद्राची भ्रमंती केली होती. चंद्रयान १ जगातील पहिले मून मिशन होते. ज्यात चंद्रावर पाणी असल्याची पुरावे मिळाले होते. त्यानंतर २०१९ ला चंद्रयान २ लॉन्च करण्यात आले. त्यात ऑर्बिटरसोबत लँडर आणि रोवरही पाठवले होते. परंतु हे मिशन पूर्णत: यशस्वी अथवा अपयशीही झाले नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्याआधी विक्रम लँडरला धडक बसली आणि ते क्रॅश झाले. मात्र ऑर्बिटर त्याचे काम करत राहिला. चंद्रयान २ मधील चुका पाहून इस्त्रोने चंद्रयान ३ मध्ये महत्त्वाचे बदल केले.
चंद्रयान ३ च्या यशानंतर लँडिंग इमेजर कॅमेऱ्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील एक फोटो घेतला आहे. त्यात लँडर कुठे लँड झाला आहे दाखवते. विशेष म्हणजे या फोटोत लँडरचा एक पाय आणि त्याची सावलीही दिसत आहे. चंद्रयान ३ ने त्याच्या सॉफ्ट लँडिंगसाठी तुलनेने सपाट प्रदेश निवडला आहे.