Chandrayaan 3 Moon Soil Temperature: भारताच्याचंद्रयान-3 मोहिमे अंतर्गत 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. यानंतर काही तासातच प्रज्ञान रोव्हरने आपले काम सुरू केले. सध्या या रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण सुरू केले आहे. इस्रोने रविवारी (27 ऑगस्ट) ट्विट करून याबाबत माहिती दिली.
इस्रोने सांगितले की, अवकाश विज्ञानाच्या इतिहासात प्रथमच चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण केले. पृष्ठभागाच्या खाली 10 सेमी पर्यंत तापमानात फरक होता. दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या मातीचे तापमान प्रोफायलिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, इस्रोने मातीच्या तापमानाचा आलेखही शेअर केला आहे. आलेखामध्ये तापमान -10 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त दिसते.
इस्रोने दिले अपडेट
इस्रोने सांगितल्यानुसार, ChaSTE पेलोड चंद्राच्या पृष्ठभागाच्या थर्मल इमेजिंगचे काम करत आहे. रोव्हरमध्ये तापमान मोजण्याचे यंत्र आहे, जे चंद्राच्या पृष्ठभाकाच्या 10 सेमीपर्यंत जाण्यात सक्षम आहे. यात 10 वेगवेगळ्या तापमानाचे सेंसर आहेत. आलेखात चंद्राचे तापमान दाखवण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी इस्रोने सांगितले होते की, चंद्रयान-3 मोहिमेतील तीनपैकी दोन उद्दिष्टे साध्य झाली आहेत, तर तिसऱ्या उद्दिष्टांतर्गत वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत. तसेच, चंद्रयान-3 मिशनचे सर्व पेलोड्स सामान्यपणे काम करत आहेत.