नवी दिल्ली : २०२० च्या अखेरीस प्रक्षेपित करण्यात येणारे चंद्रयान-३ आता २०२२ मध्ये झेप घेण्याची शक्यता आहेत, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. शिवन यांनी दिली. कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चंद्रयान-३ व देशातील पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयानासह इस्रोच्या अनेक मोहिमा प्रभावित झाल्या आहेत.
शिवन यांनी सांगितले की, चंद्रयान-३ मध्ये आधीच्या यानांप्रमाणे ऑर्बिटर नसेल. आमचे यावर काम सुरू आहे. हे चंद्रयान-२ प्रमाणेच असेल. फक्त यात ऑर्बिटर नसेल. चंद्रयान-२ बरोबर पाठविलेल्या ऑर्बिटरचाच चंद्रयान-३ साठी वापर करण्यात येणार आहे. याच्या प्रणालीवर आमचे काम सुरू आहे. २०२२ मध्ये चंद्रयान-३ झेपावेल, अशी शक्यता आहे.
चंद्रयान-२ चे प्रक्षेपण २२ जुलै २०१९ रोजी करण्यात आले होते व चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या भागात रोव्हर उतरविण्यासाठी पाठविण्यात आले होते. तथापि, चंद्रयान-२ चे लँडर विक्रम ७ सप्टेंबर २०१९ रोजी सॉफ्ट लँडिंग करण्यात अयशस्वी झाले होते. पहिल्याच प्रयत्नात हा प्रकार घडल्यामुळे भारताचे स्वप्न अधुरे राहिले होते.
सर्व चाचण्या घेतल्यानंतर मानवी मोहीम हाती घेणार
इस्रो प्रमुख के. शिवन यांनी सांगितले की, इस्रोसाठी चंद्रयान-३ महत्त्वपूर्ण मोहीम आहे. त्याद्वारे अंतरग्रहीय लँडिंगसाठी भारताचा पुढील मार्ग मोकळा करणार आहे.
गगनयान योजनेंतर्गत यावर्षी डिसेंबरमध्ये इस्रो प्रथम मानवविरहित मिशन राबविण्याच्या तयारीत आहे. वास्तविक हे गत वर्षी डिसेंबरमध्येच होणार होते. यानंतर आणखी एक मानवविरहित मिशन हाती घेतली जाईल व त्यानंतर तिसऱ्यांदा मानवी मोहीम राबवली जाईल.
गगनयान मोहिमेत २०२२ पर्यंत तीन भारतीयांना अंतराळात पाठविण्याची योजना आहे. यासाठी चार टेस्ट पायलटची निवड करण्यात आली असून, त्यांना रशियात प्रशिक्षण दिले जात आहे. तिसऱ्या मॉड्यूल मानवी मोहिमेसाठी मोठ्या तंत्रज्ञानाची गरज आहे.