नवी दिल्ली : निद्रिस्त ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होण्याची अपेक्षा आहे. १४ दिवसांच्या अंधारानंतर सूर्यकिरणे आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचू लागली आहेत. अंधारामुळे लँडर आणि रोव्हरला ‘स्लीप मोड’वर ठेवण्यात आलेले आहे. इस्रो शुक्रवारी (दि. २२) त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, लँडर व रोव्हरचे सोलर पॅनल त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडताच काम करू शकतात. इस्रोने २ सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोव्हरला तर ४ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते.
चंद्रयान-३ मोहीम केवळ १४ दिवसांचीचचंद्रयान-३ मोहीम केवळ १४ दिवसांसाठी आहे. कारण चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते. म्हणजे चंद्रावर १४ दिवस अंधार असतो आणि १४ दिवस प्रकाश असतो. रात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान उणे २३८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. रोव्हर-लँडर सूर्यप्रकाशात वीज निर्माण करू शकतो. परंतु रात्रीच्या वेळी वीज निर्मितीची प्रक्रिया थांबते. वीजनिर्मिती न झाल्यास, इलेक्ट्रॉनिक उपकरणे कडाक्याची थंडी सहन करू शकणार नाहीत व ती नादुरुस्त होतील.
स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी : स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी लँडरने चंद्रावरील नवीन ठिकाणांची तपासणी केली होती. लँडरची सर्व उपकरणे बंद करण्यात आली आहेत. फक्त रिसीव्हर चालू आहे, जेणेकरून बंगळुरूहून कमांड घेतल्यानंतर ते पुन्हा काम करू शकेल.