बंगळुरू : चंद्रयान-३ च्या यशस्वी कामगिरीनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चंद्रयान-४ च्या तयारीला लागली आहे. त्यावेळी चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याची रंगीत तालीम म्हणून ‘इस्रो’ने‘चंद्रयान-३’चे ‘प्रोपल्शन मॉड्यूल’(पीएम) चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्याची अनोखी कामगिरी पार पाडली.
‘इस्रो’ने म्हटले की, चंद्रयान-३ मोहिमेची उद्दिष्टे पूर्णपणे साध्य झाली आहेत. प्रोपल्शन मॉड्यूलचा प्राथमिक उद्देश लँडर मॉड्यूलला स्थिर कक्षेपासून चंद्राच्या ध्रुवीय वर्तुळाकार कक्षेत नेणे आणि लँडर वेगळे करणे होता, तो देखील यशस्वी झाला.
परतीची योजना का?
पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ‘शेप’ पेलोड सुरू ठेवण्यासाठी ‘प्रपोल्शन मॉड्यूल ’ला पृथ्वीच्या योग्य कक्षेत पुन्हा फिरते ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मॉड्यूलला चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळण्यापासून रोखणे किंवा पृथ्वीच्या कक्षेत ३६००० किमी आणि त्याखालील कक्षेमध्ये प्रवेश करणे, यासाठी परतीची योजना तयार केली.
अतिरिक्त इंधनाचा वापर : चंद्राच्या कक्षेत एक महिन्याहून अधिक काळ काम केल्यानंतर, प्रपोल्शन मॉड्यूलमध्ये १०० किलोपेक्षा अधिक इंधन उपलब्ध होते. त्यामुळे भविष्यातील मोहिमांसाठी अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी हे इंधन वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.