कोलकाता: भारताचे महत्वाकांक्षी चांद्रयान- 2 अखेर चंद्राच्या जवळ पोहचले असून शनिवारी (7 सप्टेंबर) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून हे इतिहास रचणार आहे. मात्र 'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.
'चांद्रयान-2'च्या लँडिंग होण्यास काही तास बाकी असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शुक्रवारी) मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मोदी सरकार चांद्रयान- 2 मिशनची अशी जाहीरात करत आहेत जसे यापूर्वी भारताने कोणतीही आंतराळ मोहीम केली नाही. देशात आर्थिक मंदीचे उभे राहीलेले संकट लपविण्यासाठी केंद्र सरकार चांद्रयान-2चा वापर करत असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेवर बोलताना न्यायव्यवस्था आपले काम करेलच, परंतु भाजपा सरकारने चिदंबरम यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी होती असे मत त्यांनी कोलकात्तामध्ये एका भाषणात मांडले आहे.
भारताच्या इतिहासात आजची मध्यरात्र सुवर्णक्षरांनी लिहिली जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोनं पाठवलेलं 'चांद्रयान-2' आज मध्यरात्री १.३० ते २.३०च्या सुमारास चंद्रावर लँड होणार आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नागरिकांना हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं आवाहन केलंय. चांद्रयानाचं लँडिंग पाहतानाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करा, मी त्यातले काही रिट्विट करेन, असंही त्यांनी जाहीर केलंय.