तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे सुपूत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील (Sanatan Hindu Dharma) वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन अनेक भाजप नेते डीएमकेसह काँग्रेसवरही टीका करत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच, राहुल गांधींना शेलक्या शब्दात टोलाही लगावला.
द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावरुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी विरोधकांवर निशाणा साधला. काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अशोक गेहलोत या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजस्थानमध्ये भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या तिसर्या फेरीच्या शुभारंभप्रसंगी जैसलमेरमधील रामदेवरा येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधींवरही शेलक्या शब्दात टीका केली. चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले, परंतु 'राहुल्यान' अद्याप लॉन्च किंवा लँड झाले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह म्हणाले, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यांचे सनातन धर्माबाबत काय विचार आहेत? इंडिया आघाडीचा पक्ष असलेल्या द्रमुकने सनातन धर्माला दुखावले आहे आणि काँग्रेस नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले. सनातन धर्माचा अपमान केल्याबद्दल इंडिया आघाडीच्या सदस्यांनी माफी मागावी, अन्यथा देश त्यांना माफ करणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, सनातन धर्म जगाला एक कुटुंब मानतो. हा धर्म 'वसुधैव कुटुंबकम' (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) असा संदेश देतो. या धर्मात मुंग्यांना पीठ अन् सापाला दूध पाजण्याची आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. अशा धर्माबाबत उदयनिदी स्टॅलिन यांनी वादग्रस्त टीका केली. त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे.