Chandrayan-3:भारताचा महत्वकांशी प्रकल्प असलेला चंद्रयान-3 लवकरच पूर्णत्वास उतरणार आहे. भारतीय अंतराळ संस्था ISRO ने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 चे विक्रम लँडर येत्या 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. पण, आता इस्रो लँडिंगची तारीख बदलू शकते, अशी माहिती इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
चंद्राच्या ज्या भागात चंद्रयान-3 चे लँडिंग होणार आहे, त्या भागात यान उतरवण्यासाठी चांगली जागा शोधणे खूप कठीण काम आहे. यानातून चंद्राचे अनेक फोटो काढण्यात आले आहे, ज्याद्वारे लँडिंगसाठी चांगली जागा शोधली जात आहे. इस्रोने ट्विटरवरही हे फोटो शेअर केले आहेत. परिस्थिती योग्य राहिल्यास चंद्रयान नियोजित तारखेला चंद्रावर उतरेल. पण, परिस्थिती योग्य नसेल, तर याची तारीख बदलू शकते.
गुजरातच्या अहमदाबाद येथे असलेल्या इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे (SAC) संचालक नीलेश एम. देसाई यांनी तारीख बदलण्याबाबत माहिती दिली आहे. चंद्रयान चंद्रावर उतरण्यापूर्वी दोन तास आधी लँडर आणि चंद्राच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल, असे SAC चे संचालक म्हणाले. सर्व परिस्थितींचा विचार केल्यानंतर लँडर उतरवले जाईल.
त्यांनी पुढे सांगितले की, जर लँडर किंवा चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नाही असे इस्रोला वाटत असेल, तर चंद्रावर लँडिंगची तारीख 27 ऑगस्टपर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या इस्रो 23 ऑगस्टलाच लँडर उतरवण्याच्या दिशेनेच पाऊले उचलत आहे.