ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 13 - नकळत नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानमध्ये गेलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण इस्लामाबादमध्ये पाकच्या ताब्यात आहे. एएनआयच्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या DGMOने चंदू चव्हाण चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकमध्ये आला होता. त्यानंतर त्याला पाक लष्करानं ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, भारताने चंदू चव्हाणविषयी त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी तो आमच्याकडे नसल्याचे स्पष्ट केलं होतं. मात्र आता पाक DGMOच्या वृत्तानुसार जवान चंदू चव्हाण इस्लामाबाद असल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान, भारताने 28 सप्टेंबर 2016 रोजी म्हणजेच बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर काही वेळाने चंदू चव्हाण हे नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेल्याची माहिती समोर आली. भारतीय सैनिक पकडल्याची माहिती खुद्द पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली. मात्र जेव्हा चंदू यांच्या सुटकेसाठी संपर्क साधला असता, भारतीय सैनिक ताब्यात नसल्याचे सांगत पाकिस्तानने त्यावेळी यू-टर्न घेतले होते.