नवी दिल्ली : काही ज्येष्ठ पक्ष नेत्यांच्या मागणीनंतर काँग्रेसने आगामी पक्षाध्यक्ष निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला असून, ही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्याला आता नऊ हजार प्रतिनिधींची यादी पाहता येणार आहे.
पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या कोणालाही ९ हजार प्रतिनिधींची यादी पाहता येईल. ही यादी पक्षाच्या दिल्लीतील केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयात २० सप्टेंबरपासून उपलब्ध असेल, असे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी म्हटले आहे. शशी थरूर, कार्ती चिदंबरम व मनीष तिवारी यांच्यासह पाच पक्ष खासदारांनी मिस्त्री यांना पत्र पाठवून प्रतिनिधींच्या नावांची यादी उपलब्ध करून देण्याची तसेच पारदर्शक व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेची मागणी केली होती.
प्रतिनिधींची नावेच माहिती नसतील तर त्यांच्याकडून पाठिंबा कसा मिळवता येईल, असा सवाल या पाच खासदारांनी केला होता. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी होणार असून, २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ज्यांना निवडणूक लढवायची आहे ते त्यांच्या राज्यातील १० प्रतिनिधींची नावे राज्य काँग्रेसच्या कार्यालयात पाहू शकतात. उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी मिळवून तो मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर संबंधिताला संपूर्ण प्रतिनिधींची यादी मिळेल, असे मिस्त्री यांनी या खासदारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यात सर्वात अलीकडे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पक्ष साेडला आहे.
उमेदवारी अर्ज कसा दाखल करावा, अशी जी चिंता निर्माण झाली होती. ती यामुळे दूर होईल. मला आशा आहे की, तुम्ही (थरूर) आणि ज्यांनी मला हे पत्र लिहिले त्यांची जी गरज होती ती यामुळे पूर्ण होईल. मला दूरध्वनी करून संवाद साधल्याबद्दल शशीजींचे आभार, असे मधुसुदन मिस्त्री यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
इच्छुकांना यादीतून समर्थकांची निवड करता येईलजर कोणाला विविध राज्यांतील दहा समर्थकांकडून नामांकन हवे असेल तर त्यांच्यासाठी सर्व ९ हजार प्रतिनिधींची यादी दिल्लीतील अ. भा. काँग्रेस मुख्यालयातील माझ्या कार्यालयात उपलब्ध असेल. २० सप्टेंबरपासून २४ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना ही यादी पाहता येईल. ते येथे येऊन यादीतून दहा समर्थक (प्रतिनिधी) निवडू शकतात आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची स्वाक्षरी मिळवू शकतात, असे मधुसुदन मिस्त्री म्हणाले.
थरूर यांनी मानले आभारया पावलाचे स्वागत करत थरूर यांनी ट्वीट केले की, आमच्या पत्राला त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाच्या रुपात हे स्पष्टीकरण आल्यामुळे समाधान वाटले. या आश्वासनांच्या दृष्टिकोनातून मी समाधानी आहे. अनेकांना निवडणूक प्रक्रियेसोबत पुढे जाण्यास आनंद होईल आणि माझ्या दृष्टिकोनातून यामुळे पक्ष मजबूत होईल.