नवी दिल्ली - भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र आठवड्याअखेरीस चक्रिवादळामध्ये परिवर्तित होऊ शकते. आएमडीकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरातील दक्षिण-पश्चिम आणि त्याला लागून असलेल्या पूर्व मध्य भागावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर पश्चिमेच्या दिशेने वळण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरच्या सकाळीपर्यंत बंगालच्या उपसागरातील मध्य भागात हे दाबाचं क्षेत्र ठरण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य भागावर चक्रीवादळामध्ये परिवर्तित होण्याची शक्यता आहे.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र वादळाचे रूप घेण्याची शक्यता आहे. मात्र याची तीव्रता आणि मार्गाबाबत अद्याप कुठलाही अंदाज व्यक्त केलेला नाही.
महापात्रा यांनी सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र बनल्यानंतर चक्रिवादळाबाबत आम्ही अधिक विवरण देऊ शकते. दरम्यान, ओदिशा सरकारने या अंदाजामुळे खबरदारी घेत २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तसेच राज्यातील किनारी जिल्ह्यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, जर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचं क्षेत्र चक्रिवादळामध्ये परिवर्तित झालं तर पश्चिम बंगाल, ओदिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो.