लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्नाटकचे मंत्री परमेश्वर यांनी राजीनामा द्यावा आणि सारे लक्ष पक्ष संघटनेकडे केंद्रित करावे, अशा सूचना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्या आहेत.विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास परमेश्वर यांना अधिक वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय दिनेश गुंडू राव आणि एस. आर. पाटील यांना प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आहे. काँग्रेस निवडणूक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालीच लढविणर आहे. दिनेश गुंडू राव यांनी दक्षिण कर्नाटककडे, तर एस. आर. पाटील यांनी उत्तर कर्नाटककडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच मंत्री डी. शिवकुमार यांना प्रचार मोहिमेचे प्रमुख करण्यात आले आहे. चांगली रणनीती आखली, तर राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येऊ शकते, असे पक्षाने केलेल्या जनमत चाचणीत आढळून आले आहे. त्यामुळे संघटना मजबूत करण्यावर राहुल यांनी भर दिला आहे. भारतीय जनता पक्षानेही कर्नाटकवर लक्ष केंद्रित केले असून, येडियुरप्पा हे आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आधीच जाहीर केले आहे. येडियुरप्पा यांच्यावर अनेक आरोप असूनही भाजपाने त्यांना पुढे करण्याचे ठरविल्याने काँग्रेसला एका अर्थी आनंदच झाला आहे. मात्र संघटनात्मक पातळीवर पक्ष कुठेही कमी पडू नये, यासाठी काँग्रेस सर्व काळजी घेत आहे. माजी केंद्रीय मंत्री मुनियप्पा यांना कार्यकारिणीवर घेण्याचा आणि सतीश जर्कीहोळ्ळी यांना राष्ट्रीय सचिव बनवण्याचा निर्णय या हेतूनच घेतला आहे. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी म्हणाले की, परमेश्वर यांना पक्ष संघटनेकडे पूर्ण लक्ष देता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटक काँग्रेसमध्ये बदल
By admin | Published: June 01, 2017 1:08 AM