ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 29 - लोकांमध्ये सुरक्षेची भावना आणि गुडांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी तुमच्या कामाची पद्धत बदला असा आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिला आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना कामाच्या पद्धतीत बदल करण्यावर जोर देण्यासोबतच पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवहार करण्यास सांगितलं आहे.
'पोलिसांनी लोकांसोबत थेट संपर्क ठेवावा. तसंच छोट्यातल्या छोट्या घटनांचीही नोंद घ्या', असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी ग्रेटर नोएडा परिसरात अफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत आणि संत कबीर नगर परिसरात झालेल्या क्रूड बॉम्ब स्फोटावरही चर्चा केली.
योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना कामाची सविस्तर योजना आखण्यास सांगितलं असून गुड पोलिसिंग धोरण अंमलात आणण्यास सांगितलं आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळी भेट देणंही महत्वाचं असल्याचं योगी आदित्यनाथांनी पोलिसांना सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकामागोमाग एक निर्णय घेण्याचा धडाका कायम ठेवला आहे. महिला आणि तरुणींसोबत होणार छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी अॅन्टी रोमिया स्क्वॉड स्थापन करण्यात आले आहे. या स्क्वॉडकडून पहिल्या दोन दिवसांतच धडक कारवाई करत 1000 हून अधिक रोडरोमियोंविरोधात कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात सध्या अॅन्टी रोमियो ऑपरेशन सुरू आहे. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत 1000 हून अधिक रोडरोमियांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. काही तरुणांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. तर काहींवर दंड ठोठावून चेतावणी देऊन सोडण्यात आले.
तसंच पोलिसांना बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यासाठी कृती आराखडा आखण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गाई तस्करीवर बंदी आणण्यासाठी सांगितलं आहे. अशा घटनांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पोलिसांचा पहारा वाढवण्याचाही आदेश देण्यात आला आहे. प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी झीरो टॉलरंस धोरणाची अंमलबाजणी करण्याचा आदेश अधिका-यांना देण्यात आला आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी हे आदेश देण्याआधीच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती.