चंडीगड : हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेसला भाजपच्या तुलनेत केवळ ०.९० टक्के म्हणजेच ३७ हजार ९७४ अधिकची मते मिळाल्याने सत्तांतर घडले. एवढ्या कमी फरकाने सत्ताबदल होण्याची १९५१ नंतर पहिलीच वेळ आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४३.९० टक्के, तर भाजपला ४३ टक्के मते मिळाली आहेत. एक टक्क्यापेक्षा कमी मतांच्या फरकातूनही काँग्रेस हा भाजपपेक्षा १५ जागांनी पुढे गेला. ६८ सदस्यीय विधानसभेत काँग्रेसला ४०, तर भाजपला २५ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या एका उमेदवाराने तर ६० मते अधिक घेत विजय मिळवला आहे.
आठ जागांवरील लढतीत विजयाचे मार्जिन केवळ १ हजारापर्यंत होते. भाजपचे भलेही दहा मंत्री हरले असतील; पण, राज्यात सर्वाधिक मते घेऊन विजयी झालेल्यांमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे आहेत. त्यांनी सिराजमधून ८४.१० टक्के मते घेत काँग्रेसचे उमेदवार चेतराम यांचा ३८ हजार मतांनी पराभव केला.
विधानसभेत पोहोचले १९ नवे आमदारहिमाचल प्रदेशात यंदा १९ नवीन आमदार निवडून आले आहेत. प्रथमच विधानसभेत दाखल झालेल्या या आमदारांपैकी ११ आमदार काँग्रेसचे आहेत. तर, ७ भाजपचे आणि एक अपक्ष आहे. काँग्रेसच्या तिकिटावर प्रथमच विजयी झालेल्या आमदारांमध्ये सुदर्शन सिंह बबलू, चंद्रशेखर, चैतन्य शर्मा, मलेंद्र राजन, विनोद सुल्तानपुरी, देवेंद्र कुमार, भुवनेश्वर गौड, रघुवीर सिंह बाली, केवल सिंह पठानिया, हरीशग जनारथा व कुलदीप सिंह राठौड यांचा समावेश आहे.
आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देत कर्मचाऱ्यांची मने जिंकली. याचा जवळपास चार लाख कर्मचारी आणि निवृत्तिधारकांना लाभ मिळणार आहे. जुनी योजना लागू करणे, महिलांना १५०० रुपये देणे, ३०० युनिट मोफत वीज आणि एक लाख तरुणांना रोजगार ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी हजारो कोटी रुपये लागणार आहेत. ही रक्कम उभी करणे सोपे काम नाही.