नवी दिल्ली - राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा प्लॅन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर मांडला आहे. आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या योजनेवर निर्णय घेणार आहेत. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसशी संबंधित विविध प्रकारचे सल्ले दिले आहेत. तसेच काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी यूपीएबाबतही महत्त्वपूर्ण असा सल्ला दिला आहे. त्यानुसार यूपीएचे अध्यक्षपद हे दोन दोन वर्षांच्या रोटेशननुसार बदलण्यात यावे, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी यासाठी एनडीएचं उदाहरण दिलं आहे. ज्याप्रकार एनडीएमध्ये निमंत्रक असायचे आणि एनडीएमध्ये ज्याप्रकारे त्यात बदल व्हायचा, त्याप्रमाणे यूपीएचे अध्यक्षपदही बदलावे, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे. तसेच यूपीएचे नाव बदलण्याचा सल्लाही प्रशांत किशोर यांनी दिला आहे. मात्र बदलेले नाव काय असावे, याबाबत प्रशांत किशोर यांनी काही सल्ला दिलेला नाही.
संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीए २००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वात अस्तित्वात आली होती. तेव्हापासून यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडे आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वासमोर एक विस्तृत योजना मांडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५६५ स्लाइड प्रशांत किशोर यांच्या प्रेझेंटेशनमध्ये होत्या. प्रशांत किशोर यांच्या प्लॅनमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून निवडणुकीबाबतची रणनीती, कम्युनिकेशन स्ट्रॅटर्जी, भविष्यातील प्रोग्रॅम यांसह सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.