ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या पारंपारिक गणवेशात बदल केला आहे. संघ स्वयंसेवक आता खाकी हाफपँटऐवजी तपकिरी रंगाची फुलपँट परिधान करणार आहेत. राजस्थान नागौर येथे सुरु असलेल्या संघाच्या तीन दिवसीय बैठकीच्या अंतिम दिवशी रविवारी संघाच्या पोषाखात बदल केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
संघाच्या गणवेशात बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून खाकी हाफपँट संघाची ओळख होती. खाकी हाफपँट सोडली तर, संघाच्या गणवेशात वेळोवेळी बदल झाले होते. संघाच्या स्थापनेपासून खाकी शर्ट आणि खाकी पँट संघाचा गणवेश होता.
१९४० मध्ये खाकी शर्टच्या जागी सफेद शर्टाचा वापर सुरु झाला. १९७३ मध्ये संघाच्या गणवेशामध्ये लेदर बुटांचा वापर सुरु झाला. त्यानंतर रेक्सिन बूट वापरण्यालाही परवानगी देण्यात आली. पँटसाठी तपकिरी रंगाची निवड केली त्यामागे कोणतेही विशेष कारण नाही. हा रंग उपलब्ध आहे आणि चांगला दिसतो म्हणून निवडला असे आरएसएसचे सरकार्यवाह भैयाची जोशी यांनी सांगितले.