आग्रा, दि. 25- भारतीय रेल्वे खरं त्यांच्या लेटलतिफ कारभारामुळे ओळखली जाते. भारतीय रेल्वेच्या गाडी कधीच वेळेवर नसतात अशी ओरडही लोकांकडून येत असते. पण आता साप आणि अजगर रेल्वेच्या या धारणेला बदलण्यासाठी क्रांतीकारीपद्धतीने मदत करत आहेत. उत्तर रेल्वेच्या 'पायथन', सेंट्रल रेल्वेच्या 'मारूती' आणि पश्चिम रेल्वेच्या 'अॅनाकोंडा' या साप आणि अजगरांची नावं असलेल्या तिन्ही रेल्वेतून जलदगतीने सामानांची ने-आण करायला मदत होत आहे. तसंच या रेल्वेचा खर्चही खूप कमी असल्याने तो रेल्वेला परवडण्यासारखा असून या तिन्ही रेल्वेमुळे रेल्वेची बचतच होत असल्याने भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलत असल्याचं रेल्वे सुत्रांचं म्हणणं आहे.
सामानांची वाहतूक करणाऱ्या या मालगाड्यांची लांबी १.४ किलोमीटर आहे तसंच त्यात जवळपास ११८ बोगी आहेत. या प्रकारच्या प्रत्येक ट्रेनमध्ये दोन रॅक (58 वॅगन), दोन ब्रेक वॅन आणि दोन ते तीन इंजिन आहेत. या ट्रेन कुठेही न थांबता वेगाने धावत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
रेल्वे अॅक्शन प्लान २०१७-१८ मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. या रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यात येणार आहे, असं, आग्रा डिव्हिजनचे विभागीय व्यवस्थापक संचित त्यागी यांनी सांगितलं आहे. काही वर्षापूर्वीच लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या सरासरी १५ ते २५ लांबपल्ल्याच्या गाड्या चालविल्या जात आहेत. मार्च २०१८ पर्यंत ही संख्या ५० पर्यंत जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आहे.
या ट्रेन चालविण्यासाठी लूप लाइनची आवश्यकता असते. अशा तीन लूप लाइन तयार करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशात अशा १०९ लूप लाइन तयार करण्याची परवानगी मिळाली असल्याचंही संचित त्यागी यांनी सांगितलं आहे. या ट्रेन खूप लांब असून जास्त वेगाने धावत असल्याने त्यांची नावं सापांवरून ठेवण्यात आल्याचंही संचित त्यागी यांनी सांगितलं आहे.