नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी हनुमान चालिसा वाचा - भाजपा नेत्याचा शेतकऱ्यांना अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 02:49 PM2018-02-13T14:49:54+5:302018-02-13T14:50:22+5:30
भाजपाच्या आमदारानं नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यानां हनुमान चालिसा वाचण्याचा अजब सल्ला दिला आहे
भोपाळ - भाजपाच्या आमदारानं नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यानां हनुमान चालिसा वाचण्याचा अजब सल्ला दिला आहे. मध्य प्रदेशमधील भाजपाच्या नेत्याने हा अजब सल्ला दिला आहे.
अवकाळी पाऊस किंवा गारपिटीच्या समस्यांसह कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करायचा असेल तर शेतकऱ्यांना हनुमान चालिसा वाचणे हाच एकमेव मार्ग आहे. असा सल्ला भाजपाचे नेते रमेश सक्सेना यांनी दिला आहे. सर्व गावातील शेतकऱ्यांनी रोज एक तास सामूहिकरित्या हनुमान चालिसा वाचावी, जेणेकरुन नैसर्गिक आपत्ती ओढवणार नाही. हनुमान चालिसा वाचल्यास गारपीट किंवा कोणतेही नैसर्गिक संकट येणार नाही, असा माझा दावा असल्याचे सक्सेना यांनी म्हटले आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, भाजपा नेत्याच्या या अजब सल्ल्याचा मध्य प्रदेशचे कृषिराज्य मंत्री बालकृष्ण पाटीदार यांनी समर्थन केलं आहे. कृषिराज्य मंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तींना माणूस जबाबदार नाही. हनुमान चालिसा वाचायलाच हवी. कारण हनुमान संकटमोचक आहेत. त्यामुळे सक्सेना यांनी काही चुकीचे म्हटले नाही.
मध्यप्रदेशमधील 400 हून अधिक गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत गारपिटीमुळे हजारो शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळं शेतीचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे.
सक्सेना यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपा नेत्यांच्या यांच्या या अजब सल्ल्याला गजव उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा म्हणाले, रमेश सक्सेना यांच्या सल्ल्यामुळे देवांमध्येच आपापसात वाद होईल. सक्सेना म्हणतायेत, हनुमान चालिसा वाचावी, मात्र मध्य प्रदेशात तर शिवशंकराची उपासना केली जाते. त्यामुळे त्यांचे विधान चूक आहे.