पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (27 मार्च) लंडनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण दिले. यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान काही विद्यार्थ्यांनी निदर्शन केले. या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत आरजी कर कॉलेज आणि घोटाळ्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित केले. मात्र, मुख्यमंत्री ममता यांनी परिस्थिती सांभाळत निदर्शकांना उत्तर दिले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या महाविद्यालयात महिला, मुले आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या सामाजिक विकासावर बोलण्यासाठी बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी बंगालमधील 'स्वास्थ्य साथी' आणि 'कन्याश्री' योजनांचाही संदर्भ दिला. यानंतर, त्यांनी बंगालमधील गुंतवणुकीवर बोलायला सुरुवात करताच, काही लोक हातात फलक घेऊन उभे राहिले. यावर, राज्यातील निवडणुका आणि हिंसाचार तसेच आरजी करचा मुद्दा होता. यावेळी निदर्शकांनी घोषणाबाजीही केली. यावर, मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत उत्तर देत निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. निदर्शकांना उद्देशून मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, "आपण माझे स्वागत करत आहात, धन्यवाद. मी आपल्याला मिठाई देईन."
माझा अपमान करून आपल्या संस्थेचा अपमान करू नका -प्रदर्शन करणाऱ्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, "माझा अपमान करून आपल्या संस्थेचा अपमान करू नका. मी देशाची प्रतिनिधी म्हणून आली आहे. आपल्या देशाचा अपमान करू नका." यानंतर, कार्यक्रमाचे आयोजक आणि तेथे उपस्थित लोक निदर्शकांविरोधात उभे राहिले आणि त्यांना तेथून जाण्यास भाग पाडले.
"रॉयल बंगाल टायगर प्रमाणे चालते दिदी" -दरम्यान मुख्यमंत्री शांततेत म्हणाल्या, "आपणच वारंवार मला येथे येण्यासाठी प्रोत्साहित केले. लक्षात असू द्या, दिदी कुणाचीही परवा करत नाही. दीदी रॉयल बंगाल टायगरसारखी चालते. जर तुम्ही मला पकडू शकत असाल, तर पकडा!" यानंतर तृणमूल काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट करत, "त्या (ममता बनर्जी) झुकत नाहीत. त्या डगमगत नाहीत, आपण त्यांना जेवढे अधिक टोकाल, त्या तेवढीच भयंकर गर्जना करतील. ममता बॅनर्जी एक रॉयल बंगाल टायगर आहेत."
आरजी कर प्रकरणावर काय म्हणाल्या ममता? - निदर्शकांनी उपस्थित केलेल्या आरजी कराच्या मुद्द्याला प्रत्युत्तर देताना ममता म्हणाल्या, "थोडे मोठ्याने बोला, मला तुमचे बोलणे ऐकू येत नाही. मी आपले सर्व म्हणणे ऐकेन. हे प्रकरण प्रलंबित आहे, हे आपल्याला माहीत आहे का? या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आता केंद्र सरकारची आहे. हे प्रकरण आता आमच्या हातात नाही. येथे राजकारण करू नका, हे राजकारणाचे व्यासपीठ नाही. माझ्या राज्यात जा आणि माझ्यासोबत राजकारण करा."