JNU Delhi :दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) आज 'साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती. या स्कीनिंगदरम्यान मोठा गोंधळ झाला. विद्यापीठात लावलेली चित्रपटाची पोस्टर्स फाडण्यात आले. तसेच, दगडफेकीची घटनाही घडली असून, अभाविपने डाव्यांवर याचा आरोप केला आहे. या गोंधळानंतर चित्रपटाचे स्क्रीनिंग थांबवण्यात आले.
डावे पुन्हा पुन्हा तेच करतात, असा आरोप अभाविपच्या एका विद्यार्थ्याने केला आहे. यापूर्वी जेव्हा आम्ही एका चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित केली होती, तेव्हाही त्यांच्याकडून असेच करण्यात आले होते. त्यात एका गार्डच्या पायाला दुखापत झाली होती. आजही डाव्या विद्यार्थ्यांकडून दगडफेक झाली, त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप अभाविपने केला आहे.
बॅडमिंटन कोर्टमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि चित्रपटाचे पोस्टर फाडले. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण आहे. विक्रांत मॅसीचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाची खूप चर्चा झाली. गुजरातमधील 2002 च्या गोध्रा घटनेच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवण्यात आला असून त्यात अनेक सामाजिक प्रश्नही मांडण्यात आले आहेत.
रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. काहींनी चित्रपटाला एकतर्फी म्हटले आहे, काहींनी त्याचे कौतुक केले आहे, तर दुसरीकडे अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त घोषित केला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्याचे भरपूर कौतुकही केले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व कॅबिनेटसाठी या चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती.