दिल्लीहून वाराणसीला जात असलेल्या गो इंडिगोच्या फ्लाईटमध्ये आज पहाटेच मोठी धावपळ उडाली होती. फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे प्रवाशांनी विमानाच्या आपत्कालीन दरवाजांमधून खाली उड्या मारल्या. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून विमानाला तपासणीसाठी खुल्या ठिकाणी नेण्यात आले आहे.
दिल्ली विमानतळावर ही घटना घड़ली आहे. पहाटे साडे पाच वाजता उड्डाणापूर्वी इंडिगोच्या क्रूला टॉयलेटमध्ये एक चिठ्ठी सापडली होती. त्यामध्ये बॉम्ब ठेवल्याचे लिहीले होते. यामुळे क्रू ने विमानतळ प्रशासनाला कळवत प्रवाशांनाही खाली उतरण्यास सांगितले. विमान खूप मोठे असल्याने व मधील जागा खूप निमुळती असल्याने प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजे उघडत बाहेर उड्या मारल्या. सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.
डॉग स्कॉड आणि बॉम्ब विरोधी पथकाने विमानाची तपासणी सुरु केली असून ही अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे. टॉयलेटमध्ये सापडलेल्या टीश्यू पेपरवर बॉम्ब असे लिहिण्यात आले होते. यामुळे विमान आयसोलेशन भागात नेण्यात आले. तिथे विमानाची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये काहीच सापडले नाही.
दिल्लीत गेल्या महिन्यात पहाटेच ५० हून अधिक शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल पाठविण्यात आले होते. यामुळे सकाळीच मोठी अफरातफरी माजली होती. शाळेत आलेल्या मुलांना माघारी पाठविण्यात आले होते. तसेच सर्व शाळांमध्ये तपासणीसाठी पोलिसांची, डॉग स्क़ॉडची मोठी धावपळ उडाली होती. नंतर फसविण्यासाठी मेल केले गेल्याचे समोर आले होते. असे असले तरी कोणतीही रिस्क घेतली जात नाहीय. आजही इंडिगोमधील बॉ़म्बची अफवाच निघाली.