श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभेत शुक्रवारी चौथ्या दिवशीही प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. जम्मू-काश्मीर विधानसभेत भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांमध्ये कलम ३७० च्या मुद्द्यावरून पुन्हा हाणामारी झाली.खासदार इंजिनिअर राशिद यांचे बंधू आणि अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी आज पुन्हा कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भात पोस्टर दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी खुर्शीद अहमद शेख यांना रोखले.
यावेळी समर्थक आणि विरोधक आमदारांमध्ये बाचाबाची झाली.विधानसभेत झालेल्या गदारोळात मार्शल यांनी खुर्शीद अहमद शेख यांना सभागृहाबाहेर काढले. तसेच, मार्शल यांनी भाजपच्या काही आमदारांनाही सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी सभात्याग केला. दरम्यान, कालही जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम-३७० रद्द केल्याच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ झाला. यावेळी समर्थक आणि विरोधक आमदार परस्परांना भिडले. यात भाजपचे तीन आमदार जखमी झाले आहेत.
सभागृहात गोंधळ सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब केले. सभागृहात कलम-३७० संदर्भात बॅनर फडकावल्याने वातावरण तापले आणि गोंधळ सुरू झाला. याचबरोबर, काल जम्मू-काश्मीर विधानसभेत केंद्रशासित प्रदेशाला पुन्हा विशेष दर्जा देण्यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी मंजूर झाला होता. त्याच्या निषेधार्थ जम्मूत गोरखा समुदायाने जम्मूत तीव्र निदर्शने केली. उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार यांचा पुतळाही जाळला.
गोंधळाचे निमित्त ठरले बॅनर खासदार इंजिनिअर राशिद यांचे बंधू आणि लंगेटचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी सभागृहात कलम- ३७०चे बॅनर फडकावले. हे बॅनर पाहून भाजप आमदार भडकले आणि त्यांनी बॅनर हिसकावून घेत फाडून टाकले. यात समर्थक व विरोधक आमदार परस्परांशी भिडले.