आपचेराज्यसभा खासदार संजय सिंह यांना राज्यसभेच्या संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ यांनी ही कारवाई केली आहे. सभापतींसमोर येऊन जोरजोरात सिंह काहीतरी बोलत होते. धनखड यांनी सांगूनही ते मागे न गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
सभागृहात कामकाज सुरु असताना खासदार प्रश्न विचारत होते. तेवढ्यात संजय सिंह हे सभापतींच्या टेबलसमोर आले आणि जोरजोरात बोलू लागले. यावेळी त्यांनी धनखड यांच्याकडे हात केला होता. यावेळी सभापती त्यांना त्यांच्या जागेवर जाण्यासाठी सांगत होते. तरीही ऐकले नाहीत म्हणून सभापतींनी मी संजय सिंहांचे नाव घेत आहे, असे म्हणत पीयूष गोयल यांच्याकडे पाहिले.
यानंतर गोयल यांनी संजय सिंह यांचे अशाप्रकारे वागणे योग्य नाहीय. हे सभागृहाच्या नियमांच्या विरुद्ध आहे. मी सभापतींना सिंह यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करत आहे. सरकार संजय सिंह यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव आणत आहे, असे म्हटले. यानंतर सभापतींनी संजय सिंह यांना पावसाळी अधिवेशन होईपर्यंत निलंबित केले आहे.
संजय सिंह यांना सतत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात येत आहे, असे धनखड यांनी जाहीर केले. हा प्रस्ताव सभागृहाला मान्य आहे का? असे धनखड यांनी विचारले. यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी हो म्हटले आणि सभापतींनी आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.