चीनच्या घुसखोरीने गदारोळ! सरकारकडे कोणती मुत्सद्दी रणनीती आहे : काँग्रेस खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:36 AM2022-12-14T05:36:57+5:302022-12-14T05:37:19+5:30

भारत-चीन सैनिकांतील चकमकीबाबत सरकारने दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसने केला. जेव्हा-जेव्हा देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेचा प्रश्न येतो, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांच्या मागे लपतात.

Chaos with the intrusion of China! What diplomatic strategy does the government have : Congress MP | चीनच्या घुसखोरीने गदारोळ! सरकारकडे कोणती मुत्सद्दी रणनीती आहे : काँग्रेस खासदार

चीनच्या घुसखोरीने गदारोळ! सरकारकडे कोणती मुत्सद्दी रणनीती आहे : काँग्रेस खासदार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चीनच्या घुसखोरीवरून संसदेत मंगळवारी विरोधकांनी गदारोळ करीत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि राज्यसभेचे दाेन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. या प्रश्नावरून विरोधकांनी सभात्यागही केला.

भारत-चीन सैनिकांतील चकमकीबाबत सरकारने दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसने केला. जेव्हा-जेव्हा देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेचा प्रश्न येतो, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांच्या मागे लपतात. चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी सरकारकडे कोणती मुत्सद्दी रणनीती आहे, असा सवाल काँग्रेस खासदारांनी लोकसभेत उपस्थित केला. संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांतील अनेक सदस्य स्पष्टीकरणाची मागणी करीत होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मात्र याबाबत खुलासा करण्यास परवानगी दिली नाही. लष्कराच्या शौर्यावर सभागृहाने एक आवाजात बोलले पाहिजे, असे ते म्हणाले. यानंतर काही विरोधी पक्षांनी सभागृहातून सभात्याग केला. दुसरीकडे, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश म्हणाले, संरक्षणमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सरकार हा विषय अतिशय गांभीर्याने घेत असल्याचे म्हटले आहे. सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे. संवेदनशील विषय पाहता स्पष्टीकरण मागितले गेले नसल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी आहेत. मात्र, विरोधी सदस्यांनी त्याला न जुमानता खुलासा करण्याची मागणी केली. विरोधी पक्षांतील अनेक सदस्य त्यांच्या आसनाजवळ येऊन घोषणा देत होते. सभागृहात गोंधळ सुरू असतानाच उपसभापतींनी प्रश्नोत्तराचा तास वाढवला. दरम्यान, काँग्रेस आणि विरोधकांच्या अनेक सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.

नेहरूंमुळे नुकसान 
n संसद भवन संकुलात पत्रकार परिषदेत गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, राजीव गांधी फाउंडेशनची नोंदणी रद्द करण्याबाबतचे प्रश्न टाळण्यासाठी काँग्रेसने संसदेत सीमा प्रश्न उपस्थित केला. 
n या फाउंडेशनला चिनी दूतावासाकडून १.३५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले होते, जे एफसीआरए कायद्यानुसार आणि निकषांनुसार नव्हते, त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नेहरूंच्या चीनवरील प्रेमामुळे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचे स्थायी सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.  

भारत-चीनमध्ये आतापर्यंतचा वाद
n १९५९ भारताने दलाई लामा यांना आश्रय.
n १९६२ भारत आणि चीन यांच्यात युद्ध
n १९६७ चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर गोळीबार केला.
n १९७५ भारत-चिनी सैनिकांमध्ये चकमक
n १९८७ तवांगच्या उत्तरेत तणाव वाढला
n २०१७ डोकलाममध्ये ७३ दिवस दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर
n २०२० गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैनिकांत जोरदार चकमक, चीनचे ३८ सैनिक मारले गेले.

भारताच्या ४३ हजार चौरस कि.मी. भूभागावर चीनचा ताबा
११ मार्च २०२० रोजी लोकसभेत उत्तर देताना तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लडाखचा सुमारे ३८ हजार चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या ताब्यात असल्याचे सांगितले होते. हे क्षेत्र  स्वित्झर्लंडपेक्षा अधिक आहे.
याशिवाय २ मार्च १९६३ रोजी चीन आणि पाकिस्तानमधील करारानुसार पाकिस्तानने पीओकेचा ५ हजार १८० स्क्वेअर कि.मी. भाग चीनला दिला होता. सध्या ४३ हजार चौरस कि.मी. भूभागावर चीनचा ताबा आहे.

...चर्चा टाळल्याने सभात्याग केला
आम्ही सातत्याने चीनचा मुद्दा सभागृहात मांडत आहोत. आजही चर्चा करायची होती; पण संरक्षणमंत्री उत्तर देऊन तेथून निघून गेले. त्यामुळे आम्ही सभात्याग केला. 
    - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस    
त्याच दिवशी माहिती का दिली नाही?
‘भारत-चीनच्या सैनिकांमध्ये ९ डिसेंबर रोजी चकमक झाली होती. या काळात संसदेचे कामकाज सुरू होते, मग त्याच दिवशी सरकारने त्याची माहिती का दिली नाही?. 
    - असदुद्दीन ओवैसी, खासदार, एमआयएम 

चीन म्हणते... सीमेवर परिस्थिती स्थिर
n भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी बीजिंग येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमांद्वारे सीमा मुद्द्यांवर सुरळीत संवाद साधला. 
n तथापि, त्यांनी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा तपशील देण्यास नकार दिला. चीन आणि भारताच्या सीमेवर सध्याची परिस्थिती सामान्यतः स्थिर आहे, असेही ते म्हणाले.

नेटकऱ्यांचा चीनवर हल्ला
भारतीय सैन्याने घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना पिटाळून लावल्याचे समोर आल्यावर भारतीय नेटकरीही आक्रमक झाले. ‘बेटा तुमसे ना हो पायेगा’, भारतीय वाघाने चिनी ड्रॅगनचा फडशा पाडला, अशा आशयाचे एकाहून एक मजेशीर मिम्स नेटिझन्सनी व्हायरल केले. तर, फक्त टिकटॉक-पब्जी बॅन करून चीनला प्रत्युत्तर देणार का? पाकिस्तानने असे केले असते तर हीच भूमिका घेतली असती का? असा सवालही अनेकांनी विचारला.

समुद्रावरही चीनचा दावा
सन १९४९ मध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झाल्यापासून चीन इतर देश आणि प्रदेशांवर कब्जा करत आहे. चीनची सीमा १४ देशांना लागून आहे; परंतु एका अहवालात असे म्हटले आहे की, चीन २३ देशांच्या भूभागावर दावा करतो. चीन दक्षिण चीन समुद्रावरही आपला हक्क सांगत आहे. इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये असलेला हा समुद्र ३५ लाख चौरस कि.मी.मध्ये पसरलेला आहे.

Web Title: Chaos with the intrusion of China! What diplomatic strategy does the government have : Congress MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.