अमृतसर : पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग यांच्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याशीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे पटेनासे झाले आहे. मी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास तयार आहे. आता तुम्ही मुख्यमंत्री व्हा व दोन महिन्यांत उत्तम कामगिरी करून दाखवा, असे आव्हान चन्नी यांनी सिद्धू यांना मंगळवारी झालेल्या भेटीत दिल्याचे समजते.काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आखून दिलेल्या १३ कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी अजून का पूर्ण नाही, असा सवाल सिद्धू यांनी विचारला असता, त्यावर चन्नी यांनी हे उत्तर दिल्याचे कळते. चन्नी व सिद्धू यांच्यातील मतभेद तीव्र झाल्याने पंजाब काँग्रेसमधील दुफळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविल्यानंतर काँग्रेस पक्षातील नेते एकजुटीने पुढील वर्षी होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी कामाला लागतील, असे वाटत होते; मात्र या पक्षातील कुरबुरी कमी होण्याऐवजी वाढीला लागल्या आहेत. नवज्योतसिंह सिद्धू यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र रविवारी सर्वांसाठी खुले केले होते. या पत्रात सिद्धू यांनी म्हटले आहे की, पंजाबमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत करण्याची शेवटची संधी आपल्या हातात आहे. पंजाबकरिता मी १३ कलमी कार्यक्रम तयार केला असून, तो तुम्ही लक्षपूर्वक पाहावा, अशी माझी विनंती आहे.
"आता तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अन् उत्तम कामगिरी करून दाखवा"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 6:26 AM