डेहराडून : उत्तराखंडमध्ये रविवारी झालेल्या हिमस्खलनामुळे चारधाम यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या यात्रेत वारंवार अडचणी येत आहेत. केदारनाथ धामपासून जवळच्या भागात रविवारी सकाळी हिमस्खलन झाले होते. त्यामुळे भाविक चिंताक्रांत झाले आहेत.
गेल्या मे महिन्यात केदारनाथ धाम येथे हिमस्खलन झाले होते. तेथील नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याने चारधाम यात्रा करणाऱ्या भाविकांच्या चिंतेत भरच पडली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, केदारनाथपासून चार किमी अंतरावर असलेल्या चारबारी ताल या भागामध्ये रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हिमस्खलन झाले. चारबारी तालहून अधिक उंचावर असलेल्या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली असावी. त्यामुळे ही घटना घडली असावी असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुसळधार पावसाने संकटात भर
हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, हवामान बदलामुळे हिमस्खलन होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. मुसळधार पाऊस पडत असताना चारधाम यात्रेसाठी दररोज येणाऱ्यांची संख्या ८०० पर्यंत खाली घसरली होती. मात्र आता पुन्हा दररोज २ हजारांहून अधिक भाविक या यात्रेसाठी येत आहेत अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.