Chardham Yatra Rules Changed: चारधाम यात्रा ही देशातील एक महत्त्वाची यात्रा मानली जाते. अनेक भाविक दरवर्षी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला जातात. ही चारधाम यात्रा भाविकांना वेगळंच समाधान देऊन जाते. मात्र या यात्रेदरम्यान विविध कारणांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा शंभरीपार गेला आहे. आतापर्यंत केदारनाथ धाममध्ये ४९, ब्रदीनाथ धाममध्ये २०, गंगोत्री धाममध्ये ७ तर यमुनोत्री धाममध्ये २५ भाविकांचा आरोग्याच्या तक्रारींमुळे व इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. रविवारीदेखील केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे प्रत्येकी एका भाविकाचा मृत्यू झाला. हाच मुद्दा लक्षात घेत, चारधाम यात्रेसंबंधीच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
काय आहे तो बदल-
गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्याच्या तक्रारींमुळे झालेले मृत्यू पाहता, चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी असलेल्या नियमावलीत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या बदल ५० वर्षांवरील प्रवासी भाविकांसाठी आहे. ५० वर्षावरील एखाद्या व्यक्तीला जर चारधाम यात्रा करायची असेल तर नव्या नियमानुसार, त्यांना हेल्थ चेकअप करणं अनिवार्य असणार आहे. जर आरोग्य तपासणीत ते पूर्णत: फिट असले तरच त्यांना चारधाम यात्रेची परवानगी दिली जाणार आहे.
हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार, उत्तराखंडच्या आरोग्य महासंचालक शैलजा भट्ट यांनी सांगितले की, चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या ५० आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व यात्रेकरूंसाठी वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तरकाशीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी केएस चौहान यांनीही याची पुष्टी केली की ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
भाविकांच्या वाढत्या मृत्यूचं कारण काय-
रुद्रप्रयागचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बीके शुक्ला यांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणीत पास न होणाऱ्या प्रवाशांना परत जाण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रदीप भारद्वाज हे केदारनाथमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा पुरवतात. त्यांना गेल्या काही काळात वाढत जाणाऱ्या मृत्यूंच्या संख्येसाठी भाविकांची प्रचंड गर्दी, अनुकूल वातावरण निर्माण करणाऱ्या यंत्रणेचा अभाव, कोविडचा भाविकांच्या आरोग्यावर झालेला प्रभाव आणि ऋतू बदल या घटकांना जबाबदार धरलं आहे.