ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १ - देशासाठी प्राणाची आहूती देणा-या सैनिकांप्रती काँग्रेस सरकारप्रमाणेच मोदी सरकार सुध्दा गंभीर नसल्याचा आरोप शहीद कॅप्टन सौरभ कालियाचे वडील डॉ. एन.के. कालिया यांनी केला आहे. कारगील युध्दातील शहीदांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालविण्यास केंद्रातील मोदी सरकारने नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या कालिया यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकारपेक्षा भाजप सरकार जास्त देशभक्त असेल अशी आम्हाला आशा होती. पण देशातील सत्ता बदलानंतरही मोदी सरकारचा दृष्टिकोन तसाच असून हे आमच्यासाठी दुर्दैव आहे अशी खंत एन.के. कालिया यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली.पाकिस्तानविरोधात भारताची कोणतीही ठोस रणनीती नसून कधी आपण पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळतो, चर्चा करतो तर कधी लढाई करतो. सत्तेत आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचा सूर मात्र एकसारखाच पाहायला मिळतो, असा आरोप डॉ. कालिया यांनी मोदी सरकारवर केला. सीमेवर लढणा-या सैनिकांचे प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने आता भाजप सरकारवर टीका सुरू केली आहे. दरम्यान, भाजपने शहीदांचा अपमान केला आहे', असा आरोप काँग्रेस नेते पी.एल. पुनीया यांनी केला आहे. कारगिल युद्धात ४ रेजिमेंटचे कॅप्टन सौरभ कालिया आणि इतर पाच सैनिक अर्जून राम, भंवर लाल बागडिया, भिक्खा राम, मुलाराम आणि नरेश सिंह हे १६ मे १९९९ रोजी कारगिलच्या काकसर सब-सेक्टरमध्ये बेपत्ता झाले होते. त्यानंतर पुढच्या महिन्यात ९ जूनला पाकिस्तानने त्यांचे मृतदेह भारताच्या हवाली केले होते. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असताना झालेल्या क्रूर मारहाणीत कॅप्टन सौरभ कालियासह हे पाचही जवान शहीद झाले होते. अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचे मृतदेह पाकने भारताला सोपवले होते. याप्रकरणी शहीद कालियाच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात याचिका करत हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेण्याची मागणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी २५ तारखेला होणाऱ्या पुढील सुनावणीत केंद्र सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
मोदी सरकार सैनिकांप्रती गंभीर नसल्याचा शहीदाच्या वडिलांचा आरोप
By admin | Published: June 01, 2015 5:25 PM