मुंबई : आता बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सला आयडीबीआय बँकेने दिलेले ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) देश सोडून परागंदा झालेले उद्योगपती विजय मल्ल्या व बँकेच्या तत्कालिन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२ आरोपींविरुद्ध विशेष कोर्टात मंगळवारी आरोपपत्र सादर केले.एक हजार पांनाच्या या आरोपपत्रांच्या प्रती दोन ट्रंकांमध्ये भरून न्यायालयास सादर केल्या गेल्या. सर्व आरोपींवर भादंवि कलम १२० बी (फौजदारी स्वरूपाचा कट), कलम ४२० (फसवणूक ) आणि भ्रष्टाचार निर्मूल कायद्याच्या कलम १३ (१) (डी) अन्वये खटला चालविण्याचा प्रस्ताव सीबीआयने केला. मल्ल्या व त्यांच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेच्या वरिष्ठांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने कर्ज मिळविले व त्यापैकी काही रक्कम नंतर मल्ल्या यांनी स्वत:च्या व्यक्तिगत वापरासाठी वळविली, असा आरोप त्यात करण्यात आला आहे.सोमवारी अटक केलेले आठ व आधी अटक केलेले तीन अशा सर्व ११ आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. किंगफिशरचे अध्यक्ष या नात्याने आरोपी असलेले विजय मल्ल्या यांचा उल्लेख ‘फरार आरोपी’ म्हणून करण्यात आला.विजय मल्ल्या याआधीच देश सोडून परागंदा झालेले आहेत. त्यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरन्ट बजावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स व सिंगापूर येथील मल्ल्या यांच्या खात्यांत असलेल्या रकमांचा तपशील मिळविण्यास त्या देशांकडे राजनैतिक माध्यमांतून ‘लेटर रोगेटरी’ पाठविण्यात आली आहेत, असे सीबीआयचे प्रॉसिक्युटर भरत बदामी यांनी सांगितले.तसेच अटकेत असलेले सर्व आरोपी प्रभावशाली असल्याने तेही मल्ल्या यांच्याप्रमाणे देश सोडून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले जावे, अशी विनंतीही बदामी यांनी केली. याउलट आयडीबीआय बँकेचे तत्कालिन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक योगेश अगरावल यांच्यासह तीन आरोपींच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. या अर्जांना उत्तर देण्यासाठी सीबीआयला एक आठवड्याची मुदत देत न्यायालयाने आरोपींना ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला व जामीन अर्जांवर ३० जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे ठरविले. खटल्यातील आरोपी किंगफिशर एअरलाइन्स- अध्यक्ष विजय मल्ल्या, माजी मुख्य वित्तीय अधिकारी ए. रघुनाथन, सहाय्यक उपाध्यक्ष शैलेश बोरकर, वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा) ए. सी. शहा व उप महाव्यवस्थापक (वित्त) अमित नाडकर्णी. आयडीबीआय बँक-माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक योगेश अगरवाल, माजी उप व्यवस्थापकीय संचालक ओ. व्ही. बुंदेलु व बी. के. बात्रा, माजी कार्यकारी संचालक एस. के. व्ही. श्रीनिवासन आणि माजी महाव्यवस्थापक आर. एस. श्रीधर. विजय मल्ल्या व त्यांच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेच्या वरिष्ठांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने कर्ज मिळविले व त्यापैकी काही रक्कम नंतर मल्ल्या यांनी स्वत:च्या व्यक्तिगत वापरासाठी वळविली, असा आरोप सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
विजय मल्ल्यांसह बँक अधिकाऱ्यांवर आरोपपत्र
By admin | Published: January 25, 2017 4:12 AM