बालासोर : ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातप्रकरणी अटक केलेल्या तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर सीबीआयने शनिवारी आरोपपत्र दाखल केले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला आहे.
बालासोर येथील रेल्वे अपघातात २९६ लोकांचा मृत्यू झाला, तर १२०० लोक जखमी झाले होते. या प्रकरणी सीबीआयने सीनिअर सेक्शन इंजिनिअर अरुणकुमार महंता, सीनिअर सेक्शन इंजिनिअर आमीर खान, टेक्निशिअन पप्पूकुमार या तिघांना अटक केली होती. हे तिघेजण बालासोर जिल्ह्यात रेल्वे यंत्रणेत कार्यरत होते. कोरोमंडल एक्स्प्रेसने एका मालवाहू रेल्वेला धडक दिली. त्यामुळे रुळावरून घसरलेल्या डब्यांना समोरुन येणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसने धडक दिली होती.
भुवनेश्वर येथील जिल्हा विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले. बालासोरमध्ये झालेल्या या अपघात प्रकरणातील तीन आरोपींकडे रेल्वे सिग्नल यंत्रणा व्यवस्थित राखण्याची जबाबदारी होती. त्यात त्यांनी हलगर्जीपणा केला, असेही आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे.