नवी दिल्ली : यूजीसी-नेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा फेरफार केलेला स्क्रीनशॉट टेलिग्रामवर प्रसारित करणाऱ्या शालेय विद्यार्थ्याविरोधात सीबीआय आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्याच्या या कृत्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी गृह मंत्रालयाच्या इशाऱ्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.
यूजीसी-नेटच्या प्रश्नपत्रिकेबाबत जो गैरप्रकार झाला, त्यामागे कोणतेही मोठे कारस्थान नव्हते, असे तपासात आढळले आहे. विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, तसे आरोपपत्रात नमूद करण्यात येईल. यूजीसीने आपल्या तपासाचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.
अशी केली चलाखी
स्क्रीनशॉट विद्यार्थ्याने तयार केला. स्क्रीनशॉटची तारीख बदलून १७ जून केली. प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध असल्याचे भासवून त्याने काही जणांकडून पैसेही उकळले होते, असे तपासात आढळून आले.
नीट : १८ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलली
नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करावी, ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घ्यावी आदी मागण्यांसाठी केलेल्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार, १८ जुलैपर्यंत पुढे ढकलली. केंद्र सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सादर केलेली प्रतिज्ञापत्रे काही पक्षकारांना उपलब्ध झाली नसल्याने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
गंगाधरच्या सीबीआय काेठडीत ४ दिवसांची वाढ
‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी-पालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आराेपी गंगाधरच्या सीबीआय काेठडीत लातूर न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे. दाेन दिवसांच्या काेठडीत सीबीआयने अनेक धागेदाेरे शाेधले असून, आता चार दिवसांच्या काेठडीत कसून चाैकशी केली जाणार आहे.