नवी दिल्ली : नवरदेवासह पाच जणांची वरात घेऊन चाललेले एक हेलिकॉप्टर चक्क एका उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात उतरले. त्यामुळे नवरदेवालाही काही काळ तुरुंगात राहावे लागले. सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. बांगलादेशातील काशीमपूर मध्यवर्ती कारागृहात ही घटना घडली. एका हौसी नवरदेवाने आपली वरात हेलिकॉप्टरने नेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक हेलिकॉप्टर भाड्याने घेतले गेले. हवाई दलाचा एक निवृत पायलट हेलिकॉप्टर चालवीत होता. अत्यंत अनुभवी असलेल्या या पायलटकडून चूक झाली आणि हेलिकॉप्टर विवाहस्थळी उतरण्याऐवजी काशीमपूरच्या मध्यवर्ती कारागृहात उतरले. कुठलीही पूर्वसूचना नसताना अचानक हेलिकॉप्टर उतरल्यामुळे तुरुंगात एकच हलकल्लोळ माजला. विशेष म्हणजे तुरुंगात असलेल्या आपल्या सहकाºयांना सोडविण्यासाठी अतिरेकी हल्ल्याचा कट आखत असल्याच्या सूचना आधीच तुरुंग प्रशासनाला मिळालेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तुरुंगात अधिकच गोंधळ उडाला.तुरुंग महानिरीक्षक ब्रिगेडिअर जनरल सय्यद इफ्तेखार उद्दीन यांनी सांगितले की, अतिरेकी तुरुंगावर हल्ला करू शकतात, अशा आम्हाला सूचना होत्या. त्यामुळे आमच्यासाठी ही बाब चिंतेची आहे. हेलिकॉप्टर सेवा व्यवस्थापनाकडून चूक झाल्याने ही घटना घडली. त्यांनी माफी मागितली आहे. चौकशीनंतर त्यांना सोडून दिले. जवळच्याच गावात त्यांना लग्नाला जायचे होते. नंतर हेलिकॉप्टर विवाहस्थळी सुखरूप पोहोचले.
वरात घेऊन आलेले हेलिकॉप्टर उतरले तुरुंगात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 4:47 AM