नवी दिल्ली - सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मारलेल्या छापेमारीबाबत रॉबर्ट वाड्रा यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली आहे. ''गेल्या पाच वर्षांपासून मला त्रास दिला जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझे मंदिरदेखील उद्धवस्त केले. या सर्व कारणांमुळे माझ्या कुटुंबाला आणि मुलांनाही त्रास सहन करावा लागत आहे'', असे वाड्रा यांनी म्हटले आहे.
वाड्रा पुढे असंही म्हणाले की, माझ्यावर लावण्यात आरोप निराधार असून हे आरोप केवळ राजकीय हेतूनं प्रेरित आहेत. मी प्रत्येक नोटीसचे उत्तप दिलेले आहे. मग विनाकारण मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास का दिला जात आहे. मी प्रत्येक चौकशीला सहकार्यही केलेले आहे. पण छापेमारीदरम्यान माझं ऑफिसदेखील तोडण्यात आले.
''हे प्रकरण जवळपास 7-8 वर्षांपासून सुरू आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये समस्या अधिक वाढल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्या सर्वांना उत्तर दिलेले आहे. ईडीनं जे काही विचारलंय त्याचं योग्य-योग्य उत्तर दिले आहे. मी कुठेही पळून जाणार नाही. मी या देशातच राहणार आहे'', असेही वाड्रा यांनी स्पष्ट केले.
'कुटुंबीयांनाही दिला जातोय त्रास'
जे काही मला सहन करावे लागणार आहे, ते मी सहन करत आहे. पण माझ्या कुटुंबीयांनाही त्रास दिला जातोय. चिंतेमुळे माझी आई तणावामध्ये आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून ती हॉस्पिटलमध्ये आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
का करण्यात आली कारवाई ?ईडीनं गेल्या आठवड्यात दिल्लीत रॉबर्ट वाड्रा यांच्यांशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. बीकानेर जमीन घोटाळाप्रकरणी आणि शस्त्रास्त्र विक्रेता संजय भंडारीशी जोडल्या गेलेल्या प्रकरणात मनी लाँडरिंग एफआयआर संबंधित ही कारवाई करण्यात आली.ईडीनं स्कायलाइट हास्पिटॅलिटी छापा मारला आणि येथील अधिकाऱ्यांची चौकशी केली. याशिवाय, वाड्रा यांना दोन वेळा समन्सही बजावण्यात आला होता.