नवी दिल्ली, दि. 4 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. गुजरात दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर धनेरा येथील लाल चौकात हा हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेसने या हल्ल्यामागे भाजपा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला आहे. भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसला आमच्यावर आरोरप करायची सवय झाली आहे असं म्हटलं आहे.
बनासकाठामध्ये राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हा सर्वांमध्ये येऊ इच्छितो, काँग्रेस पक्ष हा तुमच्यासोबत आहे. मी पूरग्रस्तांच्या सोबत आहे. तत्पूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांशी बातचीत केली होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती उद्भवली आहे. मोठ्या संख्येनं लोक पुरात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम काम करतेय. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा गुजरातच्या पूरग्रस्त स्थितीची पाहणी केली होती.