नवी दिल्ली : सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर नोंदविलेल्या गुन्ह्यातील भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी हा गुन्हा नोंदविला होता. अस्थानांवरील आरोपांत तथ्य नसल्याचे चौकशीत आढळून आल्याचा अहवाल सीबीआय तपास अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना सादर केला आहे.या प्रकरणाचा तपास सतीश डागर या सीबीआय अधिकाºयाने केला असून, त्यांनी वैयक्तिक कारणांपायी स्वेच्छानिवृत्तीसाठी आॅगस्ट महिन्यात अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले. डागर यांच्या तपास अहवालावर कायदेशीर सल्ला मागविण्यात आला असून, त्यानंतर तो सीबीआयचे संचालक ऋषीकुमार शुक्ला यांना सादर करण्यात येईल. त्यावर शुक्ला यांनी आपले मत नोंदविल्यानंतर राकेश अस्थानांवरील आरोप मागे घेण्याबद्दल सीबीआयकडून न्यायालयात अर्ज दाखल केला जाईल. मात्र, त्या प्रकरणातील दलाल मनोज प्रसाद, सोमेश प्रसाद यांची चौकशी यापुढेही सुरू राहणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. राकेश अस्थानांवरील आरोपांप्रकरणीचा तपास पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी असा अर्ज सीबीआयने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे.सीबीआय बनले रणांगणएका प्रकरणात क्लीन चिट मिळण्यासाठी मोईन कुरेशी याला राकेश अस्थाना यांना २.९५ कोटी रुपयांची लाच देण्यास भाग पाडले गेले. हा व्यवहार प्रसाद बंधूंच्या मध्यस्थीने झाला असा आरोप असून, तसा गुन्हा अस्थानांवर दाखल झाला होता. या प्रकरणात सतीश साना बाबू याला सीबीआयने साक्षीदार बनविले होते. राकेश अस्थाना व आलोक वर्मा यांच्यातील कटू संबंधांमुळे सीबीआय हे वादंगांचे रणांगण झाले होते. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या वर्षी २३ आॅक्टोबरला रात्री उशिरा निर्णय घेऊन या दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून हटविले होते.
राकेश अस्थाना यांच्यावरील आरोप मागे घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 4:14 AM