- सुरेश भटेवरा उत्तराखंडात विधानसभेच्या ७0 जागांसाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांमध्येच मुख्य लढत आहे. काँग्रेसतर्फे हरीश रावत हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत, तर भाजपाने त्यांना आव्हान देणारा आपला प्रबळ उमेदवार घोषित केलेला नाही. जनतेशी दैनंदिन संपर्क असलेला नेता अशी रावतांची प्रतिमा आहे. भाजपामध्ये भुवनचंद्र खंडुरी, भगतसिंग कोश्यारी आणि रमेश पोखरीयाल निशंक असे तीन माजी मुख्यमंत्री आहेत. यापैकी खंडुरी आणि कोश्यारी वृद्धत्वाकडे झुकले आहेत, तर पोखरीयाल यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने, त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करण्याचे भाजपाने टाळले आहे. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले चौथे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, माजी केंद्रीय मंत्री सतपाल महाराज आणि हरीश रावत यांचे कट्टर विरोधक हरकसिंग रावत हेही भाजपातर्फे स्पर्धेत आहेत. काही बंडखोर आमदारांना हाताशी धरून हरीश रावतांचे सरकार उलथवण्याचा प्रयत्न गतवर्षी भाजपाने केला. न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यामुळे तो अंगलट आला. भाजपाच्या खेळीमुळे उत्तराखंडात काही काळ राष्ट्रपती राजवटीचा अंमल होता. मात्र, कालांतराने रावत सरकार पुन्हा सत्तेवर आले. भाजपाच्या राजकारणाचा लाभ रावतांना झाला. जनतेची सहानुभूती त्यांना मिळाली. काँग्रेसने या घटनेला राज्याच्या अस्मितेशी व जनतेच्या अपमानाशी जोडले असून, निवडणूक प्रचारातही त्याचाच जोरदार वापर चालवला आहे. तरीही काँग्रेसला प्रस्थापितविरोधी वातावरणाचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या सत्तेत नाही, ही भाजपाची जमेची बाजू आहे. रावत सरकारवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा हल्ला चढवण्याची मोहीम त्यामुळेच भाजपाने आखली आहे. डेहराडूनला मध्यंतरी पंतप्रधान मोदींची विराट सभा झाली.- 2014 सालच्या प्रचंड ढगफुटीनंतर उत्तराखंडात महापुरात गावेच्या गावे वाहून गेली. पुनर्वसन कार्यात इंधनाचा मोठा घोटाळा झाला, तेव्हा राज्यात काँग्रेस सत्तेवर असल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी भाषणात केला. या घोटाळ्याला जबाबदार असलेले तत्कालीन मुख्यमंत्री बहुगुणा आता भाजपामध्ये दाखल झाले असून, ते व्यासपीठावर विराजमान आहेत, याचे भान मोदींना राहिले नाही. - रावत काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रिपदाचे अधिकृत उमेदवार असले, तरी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय व रावत यांच्यात त्यामुळेच तणाव आहे. या गटबाजीचा तोटा काँग्रेसला सोसावा लागेल. उत्तराखंडात अनेक वर्षे नारायण दत्त तिवारी गटाकडे सत्तेची सूत्रे होती. रावतांना मुख्यमंत्रिपदाची संधी बऱ्याच उशिरा मिळाली. - रावत यांच्याशी जमत नसलेल्या काँग्रेसजनांनी दरम्यान भाजपामध्ये शिरण्याचा मार्ग अनुसरला. त्यामुळे यंदा भाजपामध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा आहे. लोकांना परिवर्तन जरूर हवे आहे. मात्र, गटबाजी काँग्रेसप्रमाणेच भाजपामध्येही आहे. या पार्श्वभूमीवर सत्ता परिवर्तनाच्या घोषणेचा कितपत लाभ भाजपाला होतो, ते या निवडणुकीत ठरेल. - मुख्यमंत्री हरीश रावतांची प्रतिमा मलिन करण्यासाठी खाण आणि दारूच्या ठेकेदारीतील भ्रष्टाचार प्रकरणांचा वापर सुरू भाजपाने केला आहे. - मोदी सरकार उत्तराखंडाला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे, तर रावत यांनी राज्याला भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसवल्याचा आरोप भाजपाने केला आहे.- नोटाबंदीनंतर जनतेला हालअपेष्टा, ओआरओपीच्या निर्णयात केंद्राने माजी सैनिकांबाबत दाखवलेली अनास्था हे मुद्दे काँग्रेसच्या प्रचारात आहेत.
आरोप प्रत्यारोपांची स्पर्धा : रावत तुल्यबळ; भाजपात असंख्य इच्छुक
By admin | Published: January 08, 2017 1:09 AM