नवी दिल्ली : मालेगावमध्ये २00८ साली बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या अभिनव भारत संघटनेच्या आरोपींवर तब्बल आठ वर्षांनी, या महिन्यात आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एनआयए) सोमवारी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने एनआयएला दिल्या होत्या.या प्रकरणातील तपास आम्ही पूर्ण केला आहे आणि शक्यतो याच महिन्यात आम्ही मुंबईतील संबंधित न्यायालयात आरोपपत्र दाखल करू, असे एनआयएचे महासंचालक शरदकुमार यांनी सोमवारी सांगितले. आरोपपत्र दाखल करण्यास जाणूनबुजून बिलंब होत असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, या प्रकरणातील आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात विविध कारणास्तव धाव घेतली होती. त्या सर्व प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत आम्हाला आरोपपत्र दाखल करणे शक्य नव्हते. आता सर्व न्यायालयांतील प्रकरणे निकालात निघाली असल्याने आरोपपत्र दाखल करण्यात कोणतीही अडचण राहिलेली नाही.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात १४ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग, शिवनारायण कालसांगरा, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, श्याम साहू, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, प्रवीण टाकळकी, अजय यांना अटक करण्यात आली होती. रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे २00७ च्या समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटांमधील मालेगाव प्रकरणात फरार दाखवण्यात आले आहेत. समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटात ६८ जण मरण पावले होते. या स्फोटात प्रथमच अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेचे नाव पुढे आले होते. मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपींनी आपला बॉम्बस्फोटांशी संबंध नसल्याचे तसेच बॉम्बस्फोटांच्या कारस्थानातही सहभागी नसल्याचे म्हटले आहे.
मालेगावप्रकरणी मेमध्येच आरोपपत्र
By admin | Published: May 10, 2016 3:17 AM